ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार! – महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन

भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रशासनाला सूचना

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यामध्ये मोशी येथे कत्तलखाना प्रस्तावित केला होता. या आरक्षणास स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि सकल हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सदर आरक्षण बदल करुन, त्याच ठिकाणी गोशाळा उभारण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिक, भूमिपुत्र, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मौजे मोशी येथील नवीन गट नं. 325 (जुना गट नं. 323) या गावच्या हद्दीत कत्तलखान्यासाठी जागा आरक्षीत केली आहे. याला स्थानिक नागरिक, हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांनी विरोध केला.

दरम्यान, मोशी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. मोशी हे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे गाव असून, येथै अनेक धर्म, जाती आणि पंथाचे लोक शांततेने वास्तव्य करतात. अशा गावात कत्तलखाना सुरू केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा निर्णय आहे.

तसेच, सार्वजनिक पर्यावरण, नागरी आरोग्य आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने सदर कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करावे आणि त्या ठिकाणी गोशाळा सुरू करावी. कारण, याच परिसरात मोशीचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री. नागेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उत्सव साजरा केला जातो. तसेच, श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू यांच्यामध्ये मोशी गाव असून, वारकरी सांप्रदाय या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर आरक्षण रद्द करावे, अन्यथा मोशी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार, सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात येईल आणि त्या ठिकाणी गोशाळा आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित कमिटीसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये (डीपी) दर्शविलेल्या मोशी-डुडुळगाव दरम्यानच्या कत्तलखान्यासंदर्भात मोशी येथील ग्रामस्थांनी आज आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आळंदी देवस्थान पदाधिकाऱ्यांसह मोशी ग्रामस्थांचाही कत्तलखान्याला विरोध केला आहे. डीपीची आखणी करणाऱ्या समितीने कत्तलखान्यासाठी वेगळी जागा निश्चित करायला हवी होती. डीपी नियोजन समितीसमोर तसा प्रस्ताव ठेवणार आहे. कत्तलखान्याची जागा बदलण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या हरकती-सूचना घेतल्या जात आहेत. त्यावर सुनावणीही होणार आहे. सदर डीपी प्लॅन हा अद्याप अंतिम झालेला नाही. मोशी येथे कत्तलखाना कदापि होवू देणार नाही. त्याच ठिकाणी गोशाळा सुरू केली जाईल. याबाबत प्रशासनाकडे भूमिका मांडली आहे. भूमिपुत्र, शेतकरी, वारकरी सांप्रदाय आणि तमाम हिंदू बांधवांच्या मागणीप्रमाणे गोशाळा करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button