मोशी खाण येथील गणेश विसर्जन स्थळाची अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून पाहणी
मोशी खाण परिसरातच घेतली विविध विभागातील अधिका-यांची एकत्रित बैठक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत एकत्रीत केलेल्या गणेश मूर्तीचें मोशी खाण येथील विसर्जन ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. गणेश विसर्जन काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता अनिल भालसाखळे,उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार,निलेश भदाणे,संदीप खोत, सिताराम बहुरे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी निवेदीता घार्गे,अश्विनी गायकवाड,तानाजी नरळे,किशोर ननावरे,,पूजा दूधनाळे,सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कार्यकारी अभियंता विजय भोजने,वैशाली ननावरे,चंद्रकांत मुठाळ,सुनिलदत्त नरोटे,सतीश वाघमारे,हेमंत देसाई,विजय जाधव, सहाय्यक आरोग्याधिकारी,आरोग्य निरीक्षक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी खाण हे एकत्रित मूर्ती विसर्जनाचे स्थळ असून या ठिकाणी दरवर्षी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडते. त्यामुळे येथे गणेश विसर्जनसाठी येणाऱ्या मूर्तींसाठी वाहतूक व्यवस्था, मनुष्यबळ,क्रेन, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, या बाबींची काटेकोर तयारी आवश्यक आहे,याचा सविस्तर आढावा अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधीत अधिकाऱ्यांसोबत घेतला.
यावेळी त्यांनी विसर्जनासाठी करण्यात आलेल्या तलावांची तयारी, पाण्याची उपलब्धता, पथदिवे, दिशादर्शक फलक,रस्त्यांची स्थिती, पार्किंगची सोय, पोलीस बंदोबस्त, अग्निशामक दलाची तैनाती याबाबत माहिती घेतली. तसेच कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले.
मोशी खाण व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड शहरातील इतरही विसर्जन स्थळांवर महापालिकेतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्थळी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कृती दलाची नेमणूक करण्यात आली आहे.
मोशी खाण येथे झालेल्या पाहणीत दिलेल्या सूचनांनुसार सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही सुरू केली असून, गणेश विसर्जन काळात शहरवासीयांना सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा शहरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.गणेश विसर्जन काळात नागरिकांची सुरक्षितता आणि आदर्श विसर्जन व्यवस्था ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यानुसार सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन करावे.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.














