मोरवाडी चौकातील अनावश्यक डीव्हायडर हटवा; अन्यथा १० नोव्हेंबरला तीव्र आंदोलन – डॉ. बाबा कांबळे यांचा मनपालाच इशारा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोरवाडी चौक (अहिल्यादेवी पुतळ्यासमोर) येथे रस्त्याच्या मध्यभागी बसविलेल्या अनावश्यक आणि अशास्त्रीय काँक्रीट डिव्हायडरमुळे शहरातील नागरिक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मनपा प्रशासनावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत हा डिव्हायडर तात्काळ हटवावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे इशारा देताना सांगितले की,
“सुशोभीकरणाच्या नावाखाली मनपात मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. मोरवाडी चौकातील डिव्हायडर हा कोणत्याही वाहतूक अभ्यासाशिवाय बसविण्यात आला आहे. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता वाढली आहे. हा निर्णय रद्द करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी.”
मोरवाडी चौकातील परिस्थिती :रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद झाल्याने सकाळ-सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा,रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवासी घेणे-सोडणे कठीण,चुकीच्या उंची व रचनेमुळे अपघातांची संख्या वाढली.
संघटनेच्या मुख्य मागण्या :
डिव्हायडर बसविण्याच्या प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी ,डिव्हायडर तात्काळ हटवावा,जबाबदार भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई ,वाहतूक तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन, भविष्यातील प्रकल्पांत जनसहभाग व वाहतूक संघटनांचा सल्ला बंधनकारक,तांत्रिक अभ्यासाशिवाय केलेले सर्व अवैज्ञानिक प्रकल्प रद्द,. शहर वाहतूक नियोजनासाठी संयुक्त समिती स्थापन
१० नोव्हेंबरला तीव्र आंदोलन :
वरील मागण्यांकडे मनपाने तात्काळ दुर्लक्ष केल्यास,
सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयासमोर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शहरातील सर्व रिक्षा-टॅक्सी चालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे मुख्य संघटक शुभम तांदळे यांनी केले आहे.




















