महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मार्फत द्वारसभा आणि युनियन बोर्ड अनावरण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीतील अक्वाटेक सिस्टम्स आशिया प्रा. लि. या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनी गेल्या काही काळात भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत योग्य तोडगा निघावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारले आहे.
या कामगारांच्या मागण्या व अडचणींच्या पार्श्वभूमीवर दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी कंपनीच्या प्रांगणात द्वारसभा पार पडली. या वेळी युनियन बोर्डचे अनावरण करण्यात आले.
भोसरी विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकार अक्षय शिंदे व तुषार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली युनियन बांधणीच्या उपक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे साहेब, पिंपरी-चिंचवड शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष विशाल मानकरी, कामगार सेनेचे शशांक तिकोने यांचे मार्गदर्शन लाभले.
या बैठकीदरम्यान कामगारांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
•पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न सोडवणे
•कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या सुविधा वाढवणे
•दरमहा वेळेवर वेतन अदा करणे
•व्यवस्थापनाशी नियमित बैठक घेऊन कामगारांच्या अडचणी सोडवणे
कंपनी व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेत सकारात्मक वातावरण दिसून आले असून, कामगारांचे हक्क आणि कल्याण यासाठी यापुढे संघटितरीत्या कार्यवाही केली जाईल, असे मनसे कामगार सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
तसेच या द्वारसभा आणि युनियन बोर्ड अनावरण प्रसंगी मनसे पिंपरी चिंचवड शहरातील व भोसरी विधानसभेतील शाखा अध्यक्ष अक्षय देसले,संतोष महाजन, विक्रम भोसले, मधुकर शिंदे, अक्षय कदम, आकाश भोस्तेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सभासद कामगारांनी शांतता राखून युनियनच्या मार्गदर्शनात एकजुटीने पुढे जाण्याचे ठरवले आहे.













