निगडीतील धोकादायक एस.टी. बसथांबा तात्काळ हटवावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा – मनसेचे एस.टी. महामंडळाला अल्टीमेटम”

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी गावठाण परिसरातील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलावर एस.टी. महामंडळाच्या बसगाड्या अत्यंत धोकादायक पद्धतीने थांबवल्या जात असून, त्यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात आले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एस.टी. महामंडळास कडक शब्दांत इशारा दिला आहे की, हा धोकादायक बसथांबा तात्काळ हटवावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन छेडले जाईल.
मनसे शहराध्यक्ष सचिन तुकाराम चिखले यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष कमलेश धणराळे यांना आज हे चौथे आणि अंतिम निवेदन देण्यात आले. यावेळी योगेश लंगोटे, आकाश कांबळे, जय सकट, अनिल चव्हाण व मयूर खरात उपस्थित होते.
निगडीतील मारुती मंदिराजवळील भुयारी मार्गाशेजारी, उड्डाणपुलाच्या मध्यावर बसगाड्या थांबवल्या जात असून, प्रवाशांना जाळ्या तोडून आणि जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. काही दिवसांपूर्वीच याच भागात टँकर पलटी होऊन मोठा अपघात घडला होता. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पूर्वी सर्व एस.टी. बसगाड्या भक्ती-शक्ती चौकात थांबत होत्या, मात्र मेट्रो प्रकल्पामुळे त्या बंद करण्यात आल्या आणि थेट या धोकादायक ठिकाणी थांबा सुरू करण्यात आला. ही प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्णतः दुर्लक्ष करणारी व बेजबाबदार कृती असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या ठिकाणी आधीच तीन वेळा निवेदन देण्यात आले असून, हे चौथे आणि अंतिम निवेदन आहे. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यास मनसे आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे.













