ताज्या घडामोडीपिंपरी
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द;महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंदोत्सव साजरा

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर रद्द केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातून जनतेतून समाधान व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नागरिकांना संबोधित करताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, “माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतापेक्षा पैज जिंके, या अभंगातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले होते.आणि आज त्याच मराठी भाषेला पर्याय देण्याचे चुकीचे काम आम्ही कदापी सफल होऊ देणार नाही. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी ५ जुलै रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चाला मिळणारे प्रचंड जनसमर्थन, वाढता विरोध आणि संभाव्य आंदोलने लक्षात घेता, अखेर महायुती सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला. हे महाराष्ट्रातील भाषिक अस्मितेचे आणि लोकशक्तीचे मोठे यश आहे.भाषा हा सक्तीचा विषय नव्हे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर लादलेली भाषेची जबरदस्ती अखेर जनशक्तीपुढे झुकली आहे. ही विजयगाथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे.” असे चिखले यांनी आवर्जून सांगितले.
या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्मारक परिसरात जल्लोष करत चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच नागरिकांना लाडू व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमावेळी मनसे पदाधिकारी सीमाताई बेलापूरकर, बाळ दानवले, मनोज लांडगे, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, आदिती चावरिया, वैशाली निजामपूरकर, वैष्णवी पंडित, विद्या कुलकर्णी, श्रीकांत पाटील, गणेश शिंदे, राजेश अवसरे, नितीन चव्हाण, नितीन सूर्यवंशी, गोरक्ष मदने, हनुमान उगले, सूर्यकांत काळे, आकाश सागरे, राजू भालेराव, देवेंद्र निकम, नाथा शिंदे, सखाराम मटकर. नारायण पठारे, जयसिंग भाट संजय मरकड, रोहित थोरात, तुकाराम शिंदे, मयूर हजारे, अण्णा कापसे, आकाश चव्हाण, शरण्य पाटणे, जय सकट, विकी कांबळे, उमेश शिनगारे, विजय मस्के, प्रबुद्ध कांबळे तसेच इतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












