बंद दवाखान्यावर विधानसभेत चर्चा; आदिवासींच्या आरोग्यहक्काची आमदार उमा खापरे यांनी घेतली बाजू
नागपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल परिसरात सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गेल्या काही काळापासून बंद पडल्याची गंभीर बाब राज्य विधानसभेत समोर आली आहे. आदिवासी नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यात प्रचंड अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार उमा खापरे यांनी हा मुद्दा सभागृहात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून ठळकपणे मांडला.
आदिवासी भागातील नागरिकांसाठी हा दवाखाना जीवनरेषा मानला जातो. मात्र दवाखाना अचानक बंद झाल्याने उपचार, औषधे, गर्भवती महिलांची तपासणी, बालरोग सेवा यांसह विविध सोयी पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आमदारांनी दिली. “आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक किलोमीटर दूर जावे लागते. तातडीच्या प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो. मग दवाखाना बंद ठेवण्यामागचे कारण नेमके काय?” असा थेट सवाल खापरे यांनी सरकारला केला.
यावेळी त्यांनी संबंधित विभागाकडून तत्काळ माहिती मागवत दवाखाना पुन्हा सुरू करण्याची मागणीही केली. आदिवासी भागातील आरोग्यसेवा आधीच मर्यादित असताना, अशा सुविधांचे बंद होणे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा असल्याचे खापरे यांनी ठासून सांगितले.
राज्यातील ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ प्रकल्प हा प्राथमिक आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. त्यामुळे अशा केंद्राच्या बंदीचा प्रश्न आता स्थानिक पातळीवरही चर्चेचा विषय बनला आहे.
सरकार या प्रश्नावर कोणती पावले उचलते आणि दवाखाना पुन्हा सुरु होतो का, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.



















