ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील धर्मांतरणाच्या विरोधात आमदार उमा खापरे आक्रमक

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात सिंधी समाजातील काही व्यक्तींच्या जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भाजप आमदार उमा खापरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी याप्रकरणी सखोल तपासाची मागणी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

आमदार खापरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायद्यावर चर्चा झाली असून या कायद्याअंतर्गत कारवाईस गती देणे गरजेचे आहे. “जर आज दोन व्यक्तींचा धर्मांतराचा प्रकार समोर येतो आहे, तर अशा कितीतरी प्रवृत्ती शहरात सक्रिय असू शकतात. याचा गांभीर्याने आढावा घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून हिंदू धर्मियांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणात एक अमेरिकी नागरिकही सामील असल्याची माहिती समोर आली आहे. या अमेरिकन व्यक्तीच्या मागे कोणती संस्था आहे, त्याचे भारतात येण्याचे उद्दिष्ट काय होते, याचा तपास पोलिसांनी सखोलपणे करावा अशी मागणी खापरे यांनी केली.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींकडून हस्तगत केलेल्या मोबाईल फोनमधून काही महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. यावर अधिकृत माहिती देताना पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्तांनी सांगितले की, गृह खातेही या प्रकरणात गंभीर आहे आणि या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button