ताज्या घडामोडीपिंपरी
“दुबार लाभार्थ्यांचा पर्दाफाश – आमदार उमा खापरे यांनी सभागृहात उघड केला मुद्दा”

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील मिलिंद नगर येथे सन 2001 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत पात्र झोपडीधारकांना घरे देण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाचे काम सुरू असतानाही, पूर्वीच घर मिळालेल्या काही नागरिकांना विकासकाकडून पुन्हा एकदा घरे देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भात अनेक नागरिकांनी दुबार घर मिळवणाऱ्या नागरिकांविरोधात प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी अद्यापही घरापासून वंचित राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य उमा गिरीष खापरे यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून ही बाब उपस्थित केली. त्यांनी विकासकाने केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व दुबार लाभ घेतलेल्या झोपडीधारकांची नावे रद्द करून न्याय्य लाभार्थ्यांना घरे मिळावीत, अशी जोरदार मागणी केली.














