आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानास प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

कामशेत (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या, अपेक्षा व गरजा प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद अभियानास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानांतर्गत आमदार सुनील शेळके यांनी कामशेत शहर, कुसगाव खुर्द व चिखलसे गावांना भेट दिली. यावेळी कामशेत शहरातील गणेश मंगल कार्यालय, बाजारपेठ तसेच कुसगाव खु. व चिखलसे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या संवादादरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या—पिण्याच्या पाण्याची टंचाई, अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेऊन आमदार शेळके यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच इंद्रायणी कॉलनी, दौंडे कॉलनी, सहारा कॉलनी, पंचशील कॉलनी, देवराम कॉलनी, दत्त कॉलनी या भागातील वाढत्या लोकसंख्येला आवश्यक मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या अभियानादरम्यान महसूल विभाग, पंचायत समिती, विद्युत विभाग, PMRDA, बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MSRDC, आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या संबंधित समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश आमदार शेळके यांनी दिले. नागरिकांना आपल्या अडचणी थेट मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असून, समस्यांचे जाग्यावर निराकरण होत असल्याने या अभियानाला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले की –“जनतेच्या विश्वासामुळेच विकासकामांना गती मिळते. या जनसंवाद अभियानातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच गावाच्या प्रगतीची खरी प्रेरणा आहे. नागरिकांच्या हितासाठी व विकासासाठी हे अभियान सातत्याने राबविले जाईल.”













