ताज्या घडामोडीपिंपरीपुणेमहाराष्ट्रमावळ
मावळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार – आमदार सुनील शेळके
लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाबाबत बैठकांचे सत्र सुरू; प्रकल्प सुरू करण्याबाबत वेगवान हालचाली

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्याला जागतिक पातळीवर पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी लोणावळा स्काय वॉक प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूंचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रकल्पासाठीची जागा, पर्यायी जोडणी रस्ते आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनांवर विशेष चर्चा झाली. आमदार सुनील शेळके यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प केवळ मावळच्या पर्यटनालाच नव्हे, तर येथील स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल.
स्काय वॉक प्रकल्पांमुळे पवना धरण परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून मावळ तालुक्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर एक विशेष स्थान मिळेल. बैठकीत पर्यटन पायाभूत सुविधा उभारणी, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी विकास आणि समृद्धीचे नवे युग सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.













