ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे - आमदार शेळके निर्देश

Spread the love

 

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता  सुनील काकडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. यावेळी दुर्गम भागातील वीज समस्या दूर करण्याचा निर्धार करण्यात आला.

राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले. “आंदर मावळाला सतत भेडसावणारा वीजेचा लपंडाव आता संपायला हवा,” असे सांगत त्यांनी नव्याने मंजूर झालेल्या वडेश्वर सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

यावेळी शहरी भागांसाठी ठोस निर्णय करण्याबाबत देखील सखोल चर्चा झाली. कामशेत शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाबाबत व्यक्त केलेल्या असमाधानावर त्वरित उपाय म्हणून फीडर, कंडक्टर आणि जी.ओ.डी. बदलण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील जुने झालेल्या डी.पी. बॉक्स तातडीने बदलून नवे बसविण्याचे आदेश देण्यात आले.
देहू शहरातील वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले. तर देहूरोड कॅंटोन्मेंट भागातील वीज समस्यांवर विस्तृत चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या.

यावेळी या बैठकीस अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अतुल देवकर, किरण सरोदे तसेच वडगाव, लोणावळा, तळेगाव, देहू व देहूरोड येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच श्री. प्रविण झेंडे, योगेश काळोखे, विवेक काळोखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले
“मावळवासीयांना अखंड, सुरळीत वीजपुरवठा मिळावा हे आमचे प्राधान्य आहे. गावागावांपर्यंत वीजेचा लपंडाव दूर करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button