मावळमध्ये अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याचा आमदार सुनील शेळके यांचा निर्धार
अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध – आमदार शेळके

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अल्पसंख्यांक समाज हा आपल्या राष्ट्राच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असा निर्धार आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी आज (सोमवारी) व्यक्त केला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष बाबा मुलानी, महिला तालुकाध्यक्ष शबनम खान, वडगाव शहराध्यक्ष मजहर सय्यद, लोणावळा शहराध्यक्ष हाजी शेख, प्रवक्ते फिरोज शेख ,मुनव्वर ईमानदार , जाकिर खलीफा ,रज्जाक मनियार ,अतिक शेख, मुसा शेख , बाबुलाल नालबंद , जमिर नालबंद यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत अल्पसंख्यांक समुदायासमोरील विविध अडचणी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. मस्जिद, दफनभूमी तसेच इतर सामाजिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आला. आमदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक उत्साहात पार पडली.













