ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

रोजगार हमी योजनेंतर्गत सुधारणा, नव्या उपक्रमांची आखणी – समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Spread the love

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — महाराष्ट्र विधानभवन येथे रोजगार हमी योजना समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, ६ ऑगस्ट रोजी समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनरेगा योजनेंतर्गत सुधारणा, पायलट प्रकल्प आणि ग्रामीण मजुरांच्या हितासाठी ठोस उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत २१ ते २३ एप्रिल २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या दौऱ्याचा आढावा घेण्यात आला. विभागीय सचिवांकडून साक्ष घेण्यात आली आणि अनुपालन अहवालावर विचारमंथन करण्यात आले.

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी नव्या उपक्रमांवर भर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनरेगा जॉब कार्डधारकांना मिळणाऱ्या वेतनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

बैठकीत मनरेगा योजनेंतर्गत एक पायलट प्रकल्प हाती घेण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे, राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करून बांबू लागवड, फळबाग लागवड, वृक्षारोपण, मृद व जलसंधारण आणि रोपवाटिका व्यवस्थापन यामध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, लाभार्थी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देण्याचा प्रस्ताव सादर झाला. याला विभागीय सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

घरकुल व अन्य योजनांमध्ये गती आणण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये गती आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले गेले. याशिवाय, मंजूर कामांमध्ये अंमलबजावणीत अडथळे येऊ नयेत यासाठी स्थानिक स्तरावर आधीच स्थळ पाहणी करणे आणि लोकप्रतिनिधींचा सल्ला घेऊनच काम मंजूर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

*रोपवाटिकांमधील उत्पन्नातून मजुरांना आर्थिक लाभ मिळावा*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होणाऱ्या रोपांची इतर जिल्ह्यांमध्ये विक्री करण्यात यावी, यामुळे स्थानिक मजुरांना आर्थिक लाभ होईल आणि योजनेचे उद्दिष्टही पूर्ण होईल, असे मत मांडण्यात आले.

बैठकीस प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या बैठकीस आमदार शंकर मांडेकर, काशिनाथ दाते, बापूसाहेब पठारे, सुधाकर अडबाले, शिरीषकुमार नाईक, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक सावंतवाडी आदी अधिकारी उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत गतिमानता आणण्यासाठी आणि मजुरांच्या हितासाठी ठोस निर्णय घेणारी ही बैठक आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली परिणामकारक ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button