महसूल सप्ताहात ऐतिहासिक निर्णय : मावळ तालुक्यातील ठाकर वाडीत पाच पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना मिळणार कायदेशीर हक्क

वडगाव मावळ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वर्षानुवर्षे वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अखेर न्याय मिळाला!” महसूल सप्ताहानिमित्त मावळ तालुक्यात आज घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ठाकर वाडी, शिंदे वस्ती आणि सोमाटणे भागातील पाच पिढ्यांपासून वन हद्दीत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना ३/२ प्रकरणांतर्गत कायदेशीर हक्क देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा ऐतिहासिक निर्णय महसूल विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत, आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमधून शक्य झाला असून, या प्रक्रियेला चालना मिळवून देणारे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तसेच अनेक मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या निर्णयप्रक्रियेत सहभागी होते.
ठाकर समाजाला हक्काची जमीन
शेकडो वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले ठाकर बांधव वनविभागाच्या जाचातून त्रस्त होते. ना त्यांच्या नावावर जमीन, ना घराचा ठावठिकाणा. पण महसूल सप्ताहात घेतलेल्या निर्णयामुळे, त्यांना ३/२ कायद्यानुसार जमिनीचे पट्टे मिळणार आहेत.यामुळे त्यांचे जीवनमान बदलणार आहे आणि त्यांना घरकुल, वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी पात्र ठरवले जाईल.
या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, आरएफओ प्रकाश शिंदे, सरपंच स्वाती कांबळे, पोलीस पाटील सोनाली गायकवाड, प्रशांत भागवत, सुनील राक्षे, राकेश घारे, सेवक थोरात, विशाल दाभाडे, मंडल अधिकारी सलगर, ग्रामसेवक गोपीचंद खोमणे, तसेच सोमाटणे ग्रामपंचायतचे नितीन व विशाल मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, आदी उपस्थित होते.
आमदार शेळके : “वाडी-वस्त्यांवर जाऊन प्रश्न सोडवणार”
या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले की, “महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाडी-वस्त्यावर जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत. ठाकर बांधवांची रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ते पुढे म्हणाले, “आज माझे काही ठाकर बांधव उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदांवर काम करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ठाकर वस्त्यांमध्ये गोबर गॅस, आरओ प्लांट, सौर ऊर्जा पॅनल, अंतर्गत रस्ते, सभा मंडप आदी सुविधा पुरविल्या जातील.”
जात प्रमाणपत्र मिळालेल्या ६८ ठाकर बांधवांना दिलासा
शेळके पुढे म्हणाले, “वर्षानुवर्षे वंचित असलेल्या ६८ ठाकर बांधवांना गेल्या वर्षभरात जात प्रमाणपत्रे मिळवून दिली असून उर्वरित बांधवांसाठी लवकरच विशेष शिबिर घेण्यात येणार आहे.”
महसूल सप्ताहाचे स्वरूप : सेवा, सवलती आणि लोकाभिमुख उपक्रम
महसूल विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा केला जात असून, याचा शुभारंभ पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला.
या सप्ताहात नागरिकांना विविध सेवांवरील शुल्क सवलतीत दिल्या जात असून, “प्रशासन थेट नागरिकांच्या दारी” हा उद्देश बाळगून कार्यक्रम राबवले जात आहेत:
१ ऑगस्ट – महसूल दिन व लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
२ ऑगस्ट – पट्टे वाटप
३ ऑगस्ट – शिवार रस्ते व वृक्षारोपण
४ ऑगस्ट – प्रमाणपत्र वाटप शिबिरे
५ ऑगस्ट – घरभेटी व अनुदान वितरण
६ ऑगस्ट– अतिक्रमण निष्कासन व शर्तभंग प्रकरणे
७ ऑगस्ट – कृत्रिम वाळू धोरण अंमलबजावणी व समारोप
या सप्ताहात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या समस्या योग्य अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.














