तळेगाव दाभाडे येथे ११.३६ कोटींच्या विकासकामांचे आमदार शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे शहरात रविवार, २० जुलै २०२५ रोजी एकूण ११ कोटी ३६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.
या उपक्रमांमुळे तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रम या सर्व क्षेत्रात संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो.
कार्यक्रमात पुढील महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता:
* तळेगाव स्टेशन तळे येथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) च्या प्रकल्पाचे लोकार्पण
* संताजी नगर येथील काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण
* आमराई हॉटेलसमोरील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन
* लिंब फाटा ते मॅकडोनाल्ड समोरील सर्व्हिस रस्त्याचे भूमिपूजन
* सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
* शहरातील ‘स्मार्ट’ सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे भूमिपूजन
* श्री डोळसनाथ मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी
* बनेश्वर स्मशानभूमीतील काँक्रिट रस्त्याची पाहणी
* नगरपरिषद पार्किंगसाठी आरक्षित जागेवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम
* मोहोर प्रतिमा, एंजल हिल्स, संस्कृती सोसायटी, राव कॉलनी, म्हसकरनिस सोसायटी – या परिसरात थेट भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे
या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर नागरिक, सामाजिक संस्था, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे थेट आपल्या अडचणी मांडल्या आणि त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, “तळेगाव दाभाडे शहरात आज जे विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले, ती सगळी कामगिरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शक्य झाली आहे. त्यांच्या पाठबळामुळे मावळ मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे.”
ते पुढे म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही घडायचं आहे. तळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू.”
तळेगावच्या विकासाची गती आता अधिक वेगाने आणि दिशादर्शक पद्धतीने वाढणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले.













