७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण – आमदार शंकर जगताप यांचा ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या पुढाकाराने थेरगाव येथे राबविण्यात आलेल्या “आमदार आपल्या दारी – संवाद, सेवा, समर्पण” या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले, तर अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली.
थेरगावमधील सोनाई मंगल कार्यालय येथे गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) आयोजित या शिबिरात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवणे हेच खरे जनसेवेचे उदाहरण आहे, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात शासकीय योजना, दाखले, रेशनकार्ड, वीज, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, पर्यावरण, वाहतूक तसेच महापालिकेशी संबंधित विविध तक्रारींवर तत्काळ निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार जगताप यांनी थेट सूचना दिल्या.
उपक्रमासाठी महापालिका आणि शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात नायब तहसीलदार मदन जोगदंड, मंडळ अधिकारी विष्णू भोसले, बाबासाहेब साळुंखे, अश्विनी गायकवाड, तलाठी एच.एम. चांदेकर, सचिनानंद माहुनकर, नवनाथ मोरे, साहेबराव थोरात, सुदर्शन पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे प्रकाश भोंडवे, महावितरणचे कार्यकारी अभियंता मुंडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर थोरात, पर्यावरण विभागाचे सोहन निकम, आरोग्य विभागाचे दरवडे, विद्युत विभागाचे शेळके, जलनिस्सारण विभागाचे मोमीन, नगररचना विभागाचे महेश तावरे, पाणीपुरवठा विभागाचे बरिदे, स्थापत्य विभागाचे हेमंत देसाई, बांधकाम परवानगी विभागाचे विजय सोनवणे, ग विभागाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावर तसेच काळेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहिरट आदी अधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप यांच्यासोबत नगरसेवक संदीप गाडे, नगरसेविका मनीषा पवार, अभिषेक बारणे, तानाजी बारणे तसेच पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ७८३ नागरिकांच्या तक्रारींना प्रत्यक्ष प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी “आमदार आपल्या दारी” हा उपक्रम खर्या अर्थाने जनसेवा आणि प्रशासनातील पारदर्शकतेचे उदाहरण ठरल्याचे समाधान व्यक्त केले.













