पीएमपीएमएलच्या सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांची पदोन्नती, वेतनवाढ आणि ग्रॅज्युईटीबाबत दिलासदायक निर्णय
आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश, पीएमपीएमएलच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या पुढाकाराने पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत बैठकीत चर्चा झाली त्या अनुषंगाने सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीपासून ते सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांपर्यंत, तसेच सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) रक्कम वाढवण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निर्णयांबाबत प्रशासनिक तोडगा काढण्यात यश आले.
सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा
पीएमपीएमएलमध्ये चेकर पदासाठी यापूर्वी १०वी नापास कर्मचाऱ्यांनाही सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली होती. मात्र अलीकडील पदोन्नतीमध्ये केवळ १०वी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांनाच संधी देण्यात आली. या निर्णयामुळे नाराजी निर्माण झाली होती. यावर आमदार शंकर जगताप यांनी स्पष्टपणे मागणी केली की, “पूर्व धोरणाप्रमाणे सर्व सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी,” आणि यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता गणेशोत्सवापूर्वी
कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता गणपती सणापूर्वी दिला जाणार आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना राज्याच्या सण असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक हातभार लावण्यास मदत होणार आहे.
ग्रॅज्युईटी मर्यादा वाढीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार
राज्य शासनाच्या नियमानुसार १४ लाख रुपयांपर्यंतच सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) मिळते. मात्र ती मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवावी, अशी ठोस मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली असून, याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वित्त विभागाकडून माहिती आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तत्काळ ग्रॅज्युईटी मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दोन्ही महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक लावून सक्षम यंत्रणा उभारण्याची ग्वाही देण्यात आली.
वर्तमान व्यवस्थेनुसार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना फक्त २ लाख रुपये तात्काळ दिले जातात आणि उर्वरित रक्कम वर्षभरानंतर. या उशिरामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आमदार जगताप यांनी स्पष्ट सूचना दिल्या की, “ग्रॅज्युईटीची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी दोन्ही महापालिका आयुक्त आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्यावा.”
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन बस डेपो आणि नव्या बसेस
शहरातील वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीच्या गरजेला लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नवीन बस डेपो उभारण्याबाबत आग्रहाची मागणी करण्यात येऊन त्यासाठी पीएमआरडीए व पीसीएमसीच्या हद्दीतील जागा आरक्षित करून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे, नवीन एसी आणि नॉन-एसी बसेस शहरात सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. खास बाब म्हणजे, खाजगी ठेकेदारांच्या ऐवजी पीएमपीएमएलने स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या वाढवावी, याबाबत आमदार जगताप यांनी सीएमडी पंकज देवरे यांच्यासोबत थेट चर्चा केली.
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की,
“पीएमपीएमएलमधील हजारो कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना न्याय मिळावा, आणि नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, हा आमचा प्रमुख हेतू आहे. मी या सगळ्या निर्णयांसाठी पाठपुरावा करणारच, पण त्यांच्या अंमलबजावणीसाठीही कटिबद्ध आहे.”
या महत्त्वपूर्ण बैठकीस व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, सह-संचालक नार्वेकर, वित्त अधिकारी योगेश होले, वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे,व इतर अधिकारी उपस्थित होते.













