ताज्या घडामोडीपिंपरी
बोऱ्हाडेवाडी परिसरातील वीज समस्या सोडवण्यासाठी नवीन ‘‘ट्रान्सफॉर्मर’’ – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
परिसरातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठासाठी प्रयत्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांचा लवकरच वीज भार कमी होऊन सुलभ आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (MSEB) NSC योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडीतील पायाभूत वीज सुविधा बळकट करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील समाविष्ट गावांतील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम केल्या आहेत. यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉरचा विकास झाला असून, त्या भागातील लोकसंख्या आणि वीज ग्राहकांची मागणी हळूहळू वाढत आहे.
वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत. या भागात 200 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविला जात असून, त्याचा थेट लाभ खालची बोऱ्हाडेवाडी, सुभाष चिमण बोराडे यांच्या घराजवळील ‘फोर वे’ पासून सिल्वर ब्लू हॉटेलच्या मागील संपूर्ण परिसर, तसेच शिर्के इंजिनिअरिंगकडे जाणाऱ्या एलटी लाईन आणि संत ज्ञानेश्वर कॉलनी या भागांना होणार आहे.
या भागांमध्ये सध्या वीज भार खूप वाढलेला असून, परिणामी अनेक वेळा लाईट व्होल्टेज कमी होणे, सप्लाय ट्रिप होणे अशा समस्या उद्भवत होत्या. नवीन ट्रान्सफॉर्मर बसल्याने या सर्व समस्या दूर होतील आणि नागरिकांना स्थिर वीजपुरवठा मिळेल. यावर आमदार लांडगे यांनी वारंवार महावितरण आणि संबंधित विभागांशी पाठपुरावा करत या प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
बोऱ्हाडेवाडी आणि आसपासच्या भागातील नागरिकांच्या वीजपुरवठ्याच्या समस्या लवकरच दूर होतील. 200 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असून, यामुळे येथील वीज भार कमी होऊन वीज पुरवठा अधिक स्थिर आणि अखंडित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या NSC योजनेतून हा प्रकल्प यशस्वी होत आहे. भोसरी उपकेंद्राचे चऱ्होली आणि दिघी असे विभाजन करण्यात आले आहे. आगामी काळात वीज समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजप.













