ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध! – आमदार महेश लांडगे यांची भावना

महापौरपदी रवि लांडगे निश्चित, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प घेवून आम्ही काम करीत आहोत. महापालिका निवडणुकीपूर्वी गावकी-भावकीतील मतभेद दूर करुन एकोप्याने शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. विधानसभा निवडणुकीत झालेले मतभेद बाजूला ठेवून आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका महापौरपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांचा अर्ज भरण्यात आला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रमुख राजेश पिल्ले, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले माझे सहकारी रवि बाबासाहेब लांडगे यांनी पक्षाच्या वतीने ‘‘महापौर’’पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे त्यांची महापौरपदी निवड निश्चित आहे.

कै. अंकुशराव लांडगे, कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली..!
शहराचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे यांच्या विचारांनी आम्ही सर्वजण काम करीत आहोत. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शहराच्या प्रथम नागरिकपदाचा मान मिळतो आहे. ही खऱ्या अर्थाने अंकुशभाऊंना श्रद्धांजली ठरणार आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देवून शाश्वत विकासाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून विधायक कार्य होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राचे लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे भारतीय जनता पार्टी महापौर किंवा उपमहापौर निवडीबाबत कोणताही आनंदोत्सव साजरा करणार नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाजपा परिवारातील सदस्यांनी आनंदोत्सव साजरा न करता दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे अवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

महापालिका महापौरपदी रवि लांडगे, सत्तारुढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड निश्चित झाली आहे. उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही भरला आहे. गावकी-भावकी एकत्र राहिली पाहिजे. त्यामाध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार करुन आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button