सकाळी पत्र अन् दुपारी बैठक; ‘‘अजित सृष्टी’’ उभारणीला गती! – भाजपाचे नेते आमदार महेश लांडगे यांची संवेदनशीलता
दिवंगत अजितदादा पवार यांना कृतीतून विधायक आदरांजली

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाला सन्मान देण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. यासाठी भाजपाचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी सकाळी पत्र पाठवून प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले आणि दुपारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन पुढील नियोजन ठरवले.
पिंपरी-चिंचवड महापालिका नवीन प्रशासकीय भवनाच्या आवारात ‘‘अजित सृष्टी’’ साकारण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आर्किटेक्ट सुनील पाटील उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही महाराष्ट्राची गरज आहे.
चिंचवड येथील डी-मार्टसमोरील 33.86 एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे 8.65 एकर क्षेत्रावर मुख्य इमारतीचे काम सुरू आहे. भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, इमारतीच्या आवारात अजितदादांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.
स्मारकासह नवीन सभागृहाचे नाव ‘‘अजितदादा पवार सभागृह’’ ठेवण्याची संकल्पना असून, शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा विकास प्रवास आणि भविष्यातील नियोजन अधोरेखित करणारी ‘‘अजित सृष्टी’’ उभारण्यात येणार आहे. “हे स्मारक भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देईल आणि हिच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल.” तसेच, जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवले जावे आणि नवीन इमारतीच्या आवारात स्मारक उभारण्याचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावे, अशा सूचना यावेळी आमदार लांडगे यांनी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका नवीन प्रशासकीय भवनाच्या आवारात ‘‘सिटी सेंटर’’ उभारण्याची संकल्पना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सूचवली होती. त्याच ठिकाणी अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा आणि ‘अजितसृष्टी’ विकसित होईल. सर्वसामान्य नागरिकांसाठी पार्क आणि फाउंटन, लाईट्स, ऑब्झरव्हेशन टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. यासह देश-विदेशातून शहरात येणारे पर्यटकांना शहराची माहिती, विकास प्रकल्प, शहराच्या विकासाची वाटचाल अधोरेखित होईल, अशी संकल्पना आहे.
– सुनील पाटील, वास्तुविशारद.
“दिवंगत अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान शब्दात मांडता येणार नाही. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि विकासदृष्टीचा वारसा जपला जाईल. हे स्मारक केवळ पुतळा नसून, भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देणारे विकासाचे प्रतीक ठरेल. पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात हे एक आदर्श आणि दिशादर्शक केंद्र म्हणून उभे राहील.”
– महेश लांडगे, आमदार, भाजप.




















