ताज्या घडामोडीपिंपरी

मोशी प्राधिकरणातील वीजग्राहक नागरिकांना दिलासा! – ‘आरएमयू’ बसवण्याच्या कामाला सुरुवात – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक ४, ६, ९ तसेच गंधर्व नगरी परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या परिसराला महावितरणच्या सेक्टर १० उपकेंद्रातून कार्यान्वित जलवायु विहार या उच्चदाब विद्युत वाहिनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. परंतु, या वाहिनीवर कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण लाईन बंद ठेवावी लागे, त्यामुळे पूर्ण परिसर अंधारात जात होता. ही समस्या आता कायमस्वरुपी सुटणार आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे तीन ठिकाणी ‘आरएमयू’ बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आज या कामाची पाहणी कामगार नेते सचिन लांडगे यांनी केली. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे आणि सहकारी उपस्थित होते.

वीज ग्राहकांच्या या समस्येची दखल घेत आमदार महेश लांडगे यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता श्री. देवकर आणि सहाय्यक अभियंता श्री. नरवडे यांच्यासह जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. पाहणीदरम्यान तीन ठिकाणी RMU (Ring Main Unit) बसविण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या. जलवायु विहार सोसायटी बाहेर, साधू वासवानी स्कूल कॉर्नर आणि महाराजा चौक परिसर या ठिकाणी RMU बसवण्यात येत आहेत.

दोन आरएमयू युनिट्स आधीच उपलब्ध झाल्यानंतर तिसरे युनिटही प्राप्त झाले असून, या आरएमयू बसवण्याच्या कामाचा शुभारंभ कामगार नेते सचिन लांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

‘आरएमयू’ युनिट्स बसविण्यामुळे उच्चदाब वाहिनीचे विभाजन करता येणार असून, पुढे कोणत्याही परिसरात बिघाड झाल्यास फक्त त्या भागाचा पुरवठा बंद ठेवता येईल आणि उर्वरित परिसर सुरळीत सुरू राहील. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना लक्षणीयरीत्या कमी होतील, तसेच तक्रारींचे निरसन जलदगतीने होईल. यामुळे मोशी प्राधिकरणातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या विजेच्या अडचणींमधून मोठा दिलासा मिळणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button