तळवडेसह औद्योगिक पट्टयातील वीज सक्षमीकरणासाठी ‘‘बुस्टर’’
कॅनबे चौक येथे नवीन उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा - भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडेसह लगतचा चाकण औद्योगिकपट्टा परिसरातील परिसरातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता नवीन वीज उपकेंद्र (स्विचिंग स्टेशन) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) च्या कार्यक्षेत्रातील संबंधित जागा महावितरणकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
तळवडे भागात वाढती लोकसंख्या आणि वीजेची मागणी यामुळे देवी इंद्रायणी उपकेंद्रावर अतिरिक्त वीजभार पडला आहे. या उपकेंद्रावर भार वाढला आहे, त्यामुळे गेली 10 वर्षे वीज पुरवठा व्यवस्थेत अडचणी येत आहेत. 2018 मध्ये कॅनबे चौक येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले होते, पण जागेची समस्या असल्यामुळे कामाला प्रारंभ होऊ शकला नव्हता. याबाबत आमदार महेश लांडगे यांनी महावितरण, एमआयडीसी आणि उर्जा विभागाकडे सातत्त्याने पाठपुरावा केला आहे.
तसेच, महावितरणचे व्यवस्थापक विश्वास पाठक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महेश लांडगे यांनी यावरील उपाययोजना प्रस्तावित केली होती. त्यानंतर, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी MIDC ने सदर जागा MSEB ला हस्तांतरित केली आहे, ज्यामुळे नवीन उपकेंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, 2014 पासून आम्ही भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यात येत आहेत. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली असा ‘‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ विकासित झाला. लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली. त्याचसोबत वीज ग्राहक संख्याही वाढली. त्या तुलनेत वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भोसरी वीज उपकेंद्राचे विभाजनकरून चऱ्होली आणि दिघी उपकेंद्र निर्मिती करण्यात आली. इन्फ्रा- १ ची कामे पूर्ण झाली आहेत. इन्फ्रा- २ ची कामे प्रगतीपथावर आहेत.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी वीज पुरवठा सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तळवडे भागातील वीज समस्येवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत, नवीन उपकेंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या उपकेंद्रामुळे वीज ग्राहकांना आणि उद्योजकांना सक्षम वीज पुरवठा मिळेल, असा विश्वास आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वीज समस्यांचा निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजप.













