ताज्या घडामोडीपुणे

स्त्रियांनी सक्षमपणे घर सांभाळल्याने पुरुषांना वैभव – डाॅ.अरुणा ढेरे

एमआयटी एडीटी विद्यापीठात उर्मिलाताई कराड सभागृहाचे अनावरण

Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सावळागा गं रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या ओविचे हे चार अखंड चरण…’ या ओविंप्रमाणे भारतातील सोशिक, सात्विक परंपरेतील स्त्रिया कशाचाही विचार न करता आपले घर, परिवार उचलून धरतात. स्व. उर्मिलाताई कराड त्यातीलच एक होत्या. पूर्वीच्या काळात आमच्या बायका निरक्षर असतील पण परंतू त्या बुद्धिमान, प्रतिभावान होत्या. त्यांनी परिवारासाठी असंख्य गोष्टींचा त्याग करत आपला संसार मोठा केला. त्यामुळे, पुरुष स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडत असताना स्त्रियांनी सक्षमपणे घर सांभाळल्यामुळे पुरुषांना वैभव प्रात्प झाले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.अरुणा ढेरे यांनी मांडले.

त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या उर्मिला कराड सभागृहाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, भारतीय सिने पत्रकार पद्मश्री भावना सोमाया, सुप्रसिद्ध लेखक व कवी इंद्रजीत भालेराव, तुळशीराम कराड, काशीराम कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, सौ.ज्योती अ.ढाकणे, डाॅ.सुचित्रा उ.नागरे, सौ.पुनम आ. नागरगोजे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ढेरे पुढे म्हणाल्या, स्व.उर्मिला अनेकदा कवयित्री शांताबाई शेळके यांच्या घरी, आळंदीत भेट झाली. त्यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहांमध्ये मातृत्व, वात्सल्य, वारकरी परंपरेचे संस्कार प्रतिबिंबित होतात. या भव्य सभागृहाला त्यांचे नाव दिल्याने त्या आपल्यात सदैव जिवंत राहणार आहेत.

डाॅ.मंगेश कराड म्हणाले, स्व.उर्मिला काकी या एक त्यागमुर्ती होत्या. त्यांनी परिवारासाठी केलेल्या त्यागामुळेच आम्ही सर्व भावंड खऱ्याअर्थाने घडलो. त्यांच्या त्याग आणि आशिर्वादामुळेच आज कराड कुटुंबाची भरभराट झाली आहे. त्यांनी घर सांभाळत असताना तब्बल ९ पुस्तकांचे लेखन केले. त्यांचे कार्य या सभागृहमुळे भावी पिढीला कळत राहील.
पद्मश्री भावना सोमाया यांनीही यावेळी, स्व.उर्मिलाताईंच्या कार्याचा उल्लेख करताना, सभागृहाच्या रचनेचे कौतुक केले. ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी यावेळी स्त्रियांचा कुटुंबासाठीच्या त्यागाचे सुंदररित्या काव्यरूपी विवेचन केले. त्यांनी भाषणाच्या शेवटी स्व.उर्मिलाताईंवर लिहिलेल्या कवितेने सभागृहाला भावूक केले.
याप्रसंगी भावना सोमय्या यांच्या ‘फेरवेल कराची’ या फाळणीवर आधारीत पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह डाॅ.वि.दा.पिंगळे यांनी तर आभार सुचित्रा कराड-नागरे यांनी मानले. डाॅ.अशोक घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुण्याच्या वैभवात भर घालणारे सभागृह: प्रा.डाॅ.कराड
दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या अत्यंत जवळ असणारी ही विश्वराजबाग अत्यंत खास आहे. कला, डिजाईन आणि तंत्रज्ञान अशी ओळख असणाऱ्या या विद्यापीठाचे प्रतिबिंब या सभागृहात दिसते. हे सभागृह स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ठ नमुना असून त्याने सांस्कृतिक व शिक्षणनगरी पुण्याच्या वैभवात भर घातली आहे, असे म्हणत प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button