एमएनआईटी जयपुर-एमआयटी एडीटी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
संशोधकांसाठी समस्या हिच संधी असते! प्रा.डाॅ.एन.पी.पाधी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संशोधकांसाठी समस्या हिच संधी असते. त्यातूनच इतिहासात आजवर अनेक मोठे अविष्कार घडले व मानवी जीवन सुकर झाले. प्रतिभावान संशोधक केवळ आयआयटी सारख्या संस्थांमध्ये भेटतात ही संकल्पनाही आता कालबाह्य झाली आहे. कारण, भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड ज्ञान आणि प्रतिभा भरलेले संशोधक समोर येत आहेत ज्यांनी मानवासमोरील जटील समस्यांवर संशोधन करून उपाय शोधले आहेत. त्यामुळे, भारताच्या प्रगतीसाठी सामंजस्य करार करायला हवेत, असे मत मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे संचालक (एमएनआयटी) प्रा.डाॅ.एन.पी.पाधी यांनी मांडले.
ते एमएनआयटी जयपुर आणि येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामंज्यस्य करार प्रसंगी बोलत होते. यावेळी, एमएनआयटीचे संशोधन व सल्लागार विभागाचे अधिष्ठाता प्रा.डाॅ.लव भार्गव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु. कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, संशोधन संचालक डाॅ.विरेंद्र भोजवानी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार आदी उपस्थित होते.
या कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व प्राध्यापक देवाण-घेवाण आदी उपक्रम राबविण्याचा मार्ग खुला झाला आहे. याप्रसंगी, अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.डाॅ.कराड म्हणाले, दोन्ही संस्थांमधील हा करार ही केवळ औपचारिकता नसून देशाच्या परिवर्तनासाठी सामूहिक ज्ञाननिर्मितीचे एक पाऊल आहे.
विश्वशांती प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाद्वारे सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.भोयर यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताद्वारे करण्यात आली. तर, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.प्रतिभा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘एमआयटी-इन्स्पायर’ची स्थापना
या कार्यक्रमाप्रसंगी, एमआयटी ‘एमआयटी-इन्स्पायर’ (एमआयटी-प्रायोजित आणि नाविन्यपूर्ण संशोधन संस्था) (MIT-Institute for Sponsored & Innovative Research) या नवनिर्मित संशोधन केंद्राचा शुभारंभ झाला. प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या संकल्पनेतून आणि कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या विकसित भारत@2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत कार्य करेल.













