ताज्या घडामोडीपुणे

‘एमआयटी एडीटी’च्या प्रा.केदारींची पदकांची हॅट्ट्रिक!

आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकासह रचला इतिहास 

Spread the love
 पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात रौप्य आणि ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारात कांस्य मिळवत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्रा.केदारींनी स्पर्धेत सर्वप्रथम २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात आव्हान देताना ६:२७.५ अशी वेळ नोंदवित रौप्य कामगिरी केली. या गटात त्यांचा भारतीय सहकारी सिद्धार्थ याने (६:२५.१) याने सुवर्णपदक पटकाविले तर सौदी अरेबियाच्या हिशामने ६ः४०.७ वेळेसह कांस्य पदक पटकाविले. यानंतर  प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात भारतीय सहकारी हरप्रित कौर यांच्यासह दमदार कामगिरी करताना आपली सुवर्णपदकाची भूक पूर्ण केली. त्यानंतर, ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारातही त्यांनी दमदार झुंज देत कांस्य पदकाला गवसणी घालताना एकाच स्पर्धेत तीन पदके जिंकून भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
प्रा.केदारी हे आशियाई स्पर्धेचे गतवर्षीचे ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारातले सुवर्णपदक विजेते आहेत. यंदा, पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर रोइंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्यानंतर त्यांची भारतीय रोइंग संघात निवड झाली होती. भारतीय रोइंग संघटनेच्या (आरएफआय) अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांच्याकडून संघातील निवडीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर प्रा.केदारींनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या बोट क्लबमध्ये संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करताना, आपल्या वेळेत कमालीची सुधारणा केली. त्यामुळे, प्रा. केदारी हे सध्या पूर्णवेळ नोकरी करत आशियाई स्तरावर पदकांची हॅटट्रिक करणारे भारतातील एकमेव खेळाडू आहेत. तसेच, आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात सलग दुसऱ्यांदा निवड झालेले ते महाराष्ट्राचे एकमेव खेळाडू देखील होते.
 
या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, स्कुल ऑफ लाॅच्या अधिष्ठाता डाॅ.सपना देव, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button