‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ‘विद्यारंभ-२५’ बुधवारपासून
दहाव्या स्थापना दिनी अभिनेते अशोक सराफ यांचा होणार सन्मान

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेमध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या १०व्या बॅचचा स्वागत समारंभ अर्थात ‘विद्यारंंभ-२५’ची सुरुवात बुधवार (ता.६ ऑगस्ट) पासून तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास उभारण्यात आलेल्या ‘स्वामी विवेकानंद सभा मंडपात’ हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.
माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा.अभय करंदीकर व आयआयटी जोधपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.सुरेश गोसावी, अखिल भारतीय दहशतवादविरोधी मोर्चाचे (एआयएटीएफ) चेअरमन मनिंदर जीत सिंग बिट्टा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासह, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा. डॉ.सुनीता कराड, कार्यकारी संचालक प्रा.ज्योती ढाकणे, कार्यकारी संचालक प्रा.विनायक घैसास, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या तीन दिवसीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाबद्दल तसेच, विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, याप्रसंगी विद्यार्थ्यांना आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमात त्यांच्या अंगी असणारे कलागुण सादर करण्याचीही संधी प्राप्त होणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठात दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्याप्रमाणात नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तीन दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक उद्योग तज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांचा समावेश असेल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.राजेश एस., व कुलसचिव डॉ.चोपडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चौकट
सोमवारी (११ ऑगस्ट) एमआयटी एडीटी विद्यापीठाचा स्थापना दिन
एमआयटी एडीटी विद्यापीठाचा १०वा स्थापना दिन सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी भव्य कार्यक्रमाद्वारे हजारो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी, जेष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण, पद्मश्री अशोक सराफ व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक पद्मश्री डॉ.नागराजन वेदाचलम आणि मालवीय राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजीचे संचालक (एमएनआयटी) प्रा. डॉ.एन.पी.पाधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.














