भोसरीत ८ डिसेंबरला ‘एमएसएमई विभागीय परिषद’; लघुउद्योजकांच्या स्पर्धात्मकतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच पाऊल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योगांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या स्पर्धात्मकतेत वाढ करण्याच्या दृष्टीने एमएसएमई–डीएफओ मुंबईच्या वतीने ‘एमएसएमई संवाद – भारतातील एमएसएमईच्या खर्च आणि स्पर्धात्मकतेवर’ विभागीय परिषद (Zonal Conference) सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात आयोजित केली आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे सर्व लघुउद्योजकांना या परिषदेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर
प्लॉट नं. जे/पी–10, निगडी–भोसरी रोड, गणेश नगर, जे ब्लॉक, एमआयडीसी,
भोसरी याठिकाणी सोमवारी ८ डिसेंबरला सकाळी दहा वाजता ही परिषद होणार आहे. अधिक माहितीसाठी. एन. एन.इस्तोलकर,संयुक्त संचालक (IEDS) – 9768686250 अभय दप्तदार,सहाय्यक संचालक–गट 1 (CDO) – 9619927453 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने देशातील एमएसएमई क्षेत्रासमोरील आव्हानांची ओळख पटवून खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि स्पर्धात्मकता अधिक प्रभावी करण्यासाठी ‘एमएसएमई संवाद’ हा व्यापक राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत क्लस्टर-स्तरीय कार्यशाळा → विभागीय परिषदा → राष्ट्रीय शिखर परिषद असा त्रिस्तरीय दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
देशभरातील पहिल्या टप्प्यात ७५ ठिकाणी क्लस्टर कार्यशाळा घेण्यात आल्या असून, ६,७०० हून अधिक भागधारकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्रात नागपूर, पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या कार्यशाळांतून महत्त्वपूर्ण माहिती आणि सुचना पुढे आल्या आहेत.
आता सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात, देशातील ११ ठिकाणी विभागीय परिषदा आयोजित केल्या जात असून, महाराष्ट्रातील परिषद पुण्यात होत आहे. क्षेत्रनिहाय समस्या, खर्च-वाढीची कारणे, तंत्रज्ञानवृद्धी, वित्तपुरवठा, नियमावली सुलभीकरण आदी मुद्द्यांवर चर्चा करून कृतीशील शिफारसी तयार केल्या जाणार आहेत. या शिफारशींवर आधारित अहवाल नवी दिल्लीतील राष्ट्रीय शिखर परिषदेत एमएसएमई मंत्रालयाकडे धोरणस्तरावर हस्तक्षेपासाठी सादर केला जाईल. ही परिषद पंतप्रधानांच्या उपस्थितीत होण्याची दाट शक्यता आहे.
एमएसएमई क्षेत्रातील महत्त्वाच्या भागधारक म्हणून लघुउद्योजकांनी परिषदेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, आपले महत्त्वपूर्ण इनपुट्स द्यावेत तसेच अधिकाधिक उद्योजकांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.




















