महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका कामगारांच्या मागण्यांसाठी २४ ऑगस्टला राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकांमधील कामगार प्रतिनिधींचा एक महत्त्वपूर्ण राज्यव्यापी मेळावा दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात पार पडला. या मेळाव्याचे प्रस्ताविक फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात यांनी केले.
या मेळाव्याला बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, पनवेल, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, लातूर, धुळे, अहिल्यानगर, परभणी, इचलकरंजी या महानगरपालिकांचे कामगार प्रतिनिधी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांवर सखोल चर्चा झाली. अनेक कर्मचाऱ्यांना ३ ते ४ महिन्यांपासून वेतन न मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटीकरण वाढणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी, रुग्णालयातील सेवांचे प्रमाण निश्चित करणे, आणि चांगल्या वैद्यकीय सेवेची अंमलबजावणी आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव येथे राज्यस्तरीय मेळावा घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या मेळाव्यात मागण्या तडीस नेण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे, असे फेडरेशनचे अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले.
या मेळाव्यात विविध महानगरपालिकांचे प्रमुख कामगार नेते उपस्थित होते, त्यात शशिकांत झिंजुर्डे (पिंपरी-चिंचवड), शशांक राव, रमाकांत बने, अशोक जाधव, वामन कविस्कर (बृहन्मुंबई), मोहन तिवारी, चेतन आंबोणकर, वीरपाल भाल (ठाणे), उदय भट, मधुकर विटकर (पुणे), जगदीश देशमुख (नाशिक), अॅड. स्वप्निल काशीद (नवी मुंबई), गणेश शिंगे (नांदेड), गौतम खरात (छ. संभाजीनगर), केशव आंधळे (परभणी), दिलीप शिंदे (सांगली), प्रल्हाद कोतवाल (अमरावती), विकास लगारे (इचलकरंजी), दिनकर आवाळे, अजित तिवले (कोल्हापूर), सतीश चंडालिया, अनिल कांबळे (पनवेल), दीपक राव (भिवंडी), बापूसाहेब सदाफुळे (सोलापूर), अंकुश गायकवाड (लातूर), प्रवीण तंतरपाळे (नागपूर), रमेश जगताप (मालेगाव) यांचा समावेश होता.
या मेळाव्याचे प्रास्ताविक फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात यांनी केले. तर आभार मोहन तिवारी यांनी मानले.








