“गुन्हेगारीमुक्त नवी सांगवीसाठी मेघराज लोखंडे यांचा संकल्प — नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणार”

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी परिसरात अलीकडच्या काळात चोरी, मोबाईल स्नॅचिंग, वाहनचोरी आणि तरुणांच्या टोळ्यांमधील हाणामारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि महिलांमध्येही भीतीचे सावट पसरले आहे.
स्थानिक रहिवाशांनी या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी आपल्या निवेदनात काही ठोस मागण्या केल्या आहेत —
रात्रीच्या गस्तीत वाढ करावी
संवेदनशील ठिकाणी पोलीस पथके नेमावीत
निकामी झालेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत
नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढवण्यासाठी सुरक्षा समित्या सक्रिय कराव्यात
या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत मेघराज लोखंडे यांनी नवी सांगवी परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले,
“गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नागरिक, पोलीस आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. परिसरातील तरुणाईला सकारात्मक मार्गावर आणण्यासाठी क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातील. नवी सांगवी गुन्हेगारीमुक्त करणे हा माझा संकल्प असून, यासाठी सर्वांच्या सहकार्याने ठोस कृती आराखडा तयार केला जाईल.”
लोखंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. आपल्याच परिसराच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.”
दरम्यान, पोलिस प्रशासनाकडूनही रात्रीच्या गस्तीत वाढ आणि सीसीटीव्ही प्रणालीच्या दुरुस्तीबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत पोलिस आणि स्थानिक पातळीवर संयुक्त बैठक घेऊन सुरक्षा आराखडा निश्चित केला जाणार आहे.




















