ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

मांजरेवाडीकरांच्या ‘अपेक्षे’ला न्याय द्या!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे आमदार महेश लांडगे यांची मागणी

Spread the love

अत्याचारी प्रवृत्तीला वचक बसली पाहिजे;’फास्टट्रॅक कोर्टात’ खटला चालवा!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खेड तालुक्यातील मौजे मांजरेवाडी (धर्म) येथील महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमधील आरोपी अटक आहे. मात्र, पालक तसेच परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत आहेत. या घटनेतील आरोपीचा खटला तात्काळ ‘फास्टट्रॅक कोर्टात’ चालविण्यात यावा. सदर गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. महिला भगिनींवर वाकडी नजर ठेवत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जरब बसावी यासाठी, अशी शिक्षा गरजेची आहे असेदेखील आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पीडित कुटुंबीयांची आमदार लांडगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. मांजरे कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. अत्याचारात मृत्युमुखी पडलेल्या मुलीबाबत शोक व्यक्त केला.

मौजे मांजरेवाडी (धर्म) येथील शेतकरी कुटुंबातील 17 वर्षीय विद्यार्थिनी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महावि‌द्यालय या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर त्यांच्याच गावातील नराधम आरोपी नवनाथ कैलास मांजरे याने अमानुष अत्याचार करून तिचा निर्घण खून केला. पुरावा नष्ट करत तिचा मृतदेह नदीपर्यंत ओढीत नेऊन भीमा नदीत टाकला होता.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, शेतकरी कुटुंबातील ही विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेत होती. याशिवाय ती उत्कृष्ट कबड्डीपटू उद्यान्मुख खेळाडू होती. अनेक कष्ट करत संबंधित विद्यार्थिनीचे पालक तिला उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहत होते. मात्र समाजातील एका विकृतीमुळे हे स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. त्यामुळे अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. राजगुरुनगरमधील ही घटना माणुसकीला, नातेसंबंधांना काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी समाजातील विकृत प्रवृत्तींवर जरब बसविणे गरजेचे झाले आहे. राजगुरुनगरमधील घटनेमध्ये ही आपल्यामध्येच वावरणाऱ्या एका विकृतीमुळे उदयोन्मुख तरुणीचा अंत झाला. ही घटना मनाला हेलावून टाकणारी आहे. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे सरकारने केलेले आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. सदर खटला ‘फास्टट्रॅक कोर्ट’मध्ये चालवून आरोपीला फाशीच व्हावी, अशी मागणी आहे.

– महेश लांडगे,
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button