“सुरमयी दिवाळी पहाटेत चिंचवडकर मंत्रमुग्ध – संगीत, भक्ती आणि आनंदाचा अविस्मरणीय संगम”

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रकाश, आनंद आणि उत्साहाच्या झगमगाटात चिंचवड परिसरातील रसिक संगीतप्रेमींची दिवाळीची पहाट यंदा खऱ्या अर्थाने सुरेल ठरली. कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने, तसेच माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी, मनिषा स्मृती निवास, भोईर नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि तालवाद्यांच्या झंकाराने भोईर नगर परिसर दुमदुमून गेला. रसिक संगीतप्रेमींनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून या सुरेल पर्वाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात अजिंक्य देशपांडे यांच्या ‘सूर निरागस हो…’ या लोकप्रिय भावगीताने झाली आणि क्षणातच उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
यानंतर भक्ती आणि भावनेने ओथंबलेली गीते सादर झाली. मधुसुदन ओझा यांनी ‘विठ्ठल आवडी प्रेम भावे’ आणि ‘मोरया’ ही भक्तिगीते सादर करत वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. भार्गव जाधव यांनी ‘विठू कैवल्याचा’, पियुष भोंडे यांनी ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ आणि ‘आली ठुमकत नार’ ही गीते सादर केली.तबल्यावर तेजस जाधव यांनी अप्रतिम साथ दिली.
कार्यक्रमात मानसी भोईर घुले व भाऊसाहेब भोईर यांचे ‘प्रीतीचा झुळ झुळ पाणी’, अमोल यादव व कोमल यादव यांचे ‘अश्विनी येना’, तसेच सार्थक भोसले व मानसी भोसले यांचे ‘मधुमास नवा’ ही द्वंद्वगीते रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. अजिंक्य देशपांडे आणि पियुष भोंडे यांच्या ‘शिर्डीवाले साई बाबा’ या भक्तिगीताने कार्यक्रमात अध्यात्मिक ऊर्जेची झंकार निर्माण केली.
सॅक्सोफोन वादक पियुष तिवारी यांनी ‘गुलाबी आंखे’ हे इन्स्ट्रुमेंटल सादर करत रसिकांना रोमँटिक सुरांच्या दुनियेत नेले. त्यानंतर पियुष तिवारी आणि सचिन वाघमारे यांनी सॅक्सोफोन आणि बासरीवर मनमोहक जुगलबंदी सादर करून कार्यक्रमात संगीताची नवी उंची गाठली.
या कार्यक्रमात सुनील जाधव (कीबोर्ड), सचिन वाघमारे (बासरी), पियुष तिवारी (सॅक्सोफोन), प्रवीण जाधव (ऑक्टोपॅड / रिदम मशीन), प्रमोद शेंडगे (पखवाज, ढोलक, ढोलकी) आणि चंद्रशेखर गायकवाड (तबला / काँगो) यांनी आपल्या वादनकौशल्याने कार्यक्रमाला अप्रतिम रंग चढवला. ध्वनी संयोजन फिरोज रमजानी यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळले.
शेकडो संगीतप्रेमींनी उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. संगीत, भक्ती आणि आनंद यांचा संगम असलेली ही ‘सुरमयी दिवाळी पहाट’ चिंचवडकरांसाठी अविस्मरणीय ठरली.













