संवेदनशीलतेसोबत संधी उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तीही अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात – उपायुक्त ममता शिंदे
दिव्यांग भवन येथे आयोजित रोजगार मेळाव्यात ५८७ उमेदवारांची नोंदणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवत आहे. पण केवळ योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याऐवजी आपण त्यांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे गरजेचे आहे. दिव्यांगांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासन आणि समाजाची सामायिक जबाबदारी आहे. संवेदनशीलतेसोबत संधी उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तीही अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, असे प्रतिपादन समाजविकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले. दिव्यांग भवन येथे ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ अंतर्गत आयोजित दिव्यांग बांधवांच्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी महापालिका दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक परेश गांधी, एनेबल इंडियाचे प्रतिनिधी प्रीती लोबो, स्पार्क मिंडा कंपनीचे सुमेध लव्हाळे, बिग बास्केट कंपनीचे अमोल पवार, सी.एस.आर. सेलच्या श्रुतिका मुंगी, दिव्यांग संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग उमेदवार, त्यांचे पालक, महापालिका आणि दिव्यांग भवनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
उपायुक्त शिंदे म्हणाल्या, संधी, सुविधा आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळाल्यास दिव्यांग नागरिक हे केवळ लाभार्थी नव्हे तर समाजाच्या प्रगतीस हातभार लावणारे घटक बनू शकतात. प्रत्येक कंपनीने, प्रत्येक संस्थेने सामाजिक जबाबदारी म्हणून दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी द्यावी. सर्वसमावेशक समाज निर्माण करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे. समाजात दिव्यांगांविषयी असणारे गैरसमज आणि मानसिक अडथळे दूर करून त्यांना समान संधी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना फडतरे यांनी केले, तर कुणाल बनुबाकोडे यांनी आभार व्यक्त केले.
प्रशिक्षण व समुपदेशन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजविकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे व दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी दिव्यांग भवन फाउंडेशनमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग युवकांना रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत बांधवांचा पहिला रोजगार मेळावा दिव्यांग भवन येथे घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ५८७ दिव्यांग उमेदवारांनी नावनोंदणी केली होती. रोजगार मेळाव्यापूर्वी दिव्यांग उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना प्रशिक्षण व समुपदेशन याद्वारे मुलाखतीसाठी आवश्यक पूर्वतयारीही करून घेण्यात आली होती.
२५ दिव्यांग बांधवांना मिळाली नोकरी
दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्यांतर्गत स्पार्क मिंडा आणि बिग बास्केट या दोन कंपन्यांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ५८७ उमेदवारांनी नावनोंदणी केली होती, त्यापैकी महापालिका हद्दीतील १५१ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुलाखतीत ६४ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये २२ उमेदवार अस्थिव्यंग, ३३ विशेष दिव्यांगत्व, लो व्हिजन प्रवर्गातील २, मूकबधिर प्रवर्गातील ७ आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश होता. बिग बास्केट कंपनीसाठी २२ उमेदवारांनी मुलाखत दिली असून त्यापैकी ११ उमेदवारांची निवड झाली. तर स्पार्क मिंडा कंपनीसाठी ४५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी १४ उमेदवारांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग युवकांना योग्य संधी मिळावी यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
दिव्यांग युवकांनी कधीही आपल्या स्वप्नांना मर्यादा घालू नका. तुम्हाला जे करायचं आहे, जसं बनायचं आहे, त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संघर्षामुळे तुमच्यात एक वेगळंच, दिसत नसलेलं पण खूप मजबूत सामर्थ्य तयार झालं आहे. तेच सामर्थ्य आज तुमचं खऱ्या अर्थानं बळ आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमची क्षमता दाखवण्याची एक छान संधी आहे. आत्मविश्वासाने बोला, आपली कौशल्यं वाढवत राहा आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल.
— निवेदिता घार्गे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष




















