सम्यक विचारांचा निष्ठावान पाईक – महेंद्र भारती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारकडून मराठीसह पालीला ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला. यामुळे पाली भाषेचे अभ्यासक आणि निष्ठावान प्रचारक असलेल्या महेंद्र भारती यांना मनापासून आनंद झाला. बालपणापासून पाली भाषेविषयी त्यांना वाटणारी आत्मीयता उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असताना शासकीय पातळीवर झालेल्या या निर्णयाने महेंद्र भारती यांच्या मराठी – पाली साहचर्य चळवळीला एकप्रकारे बळकटी प्राप्त झाली आहे. उरण – इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील मूळ रहिवासी असलेले महेंद्र भारती हे सुमारे चाळीस वर्षांपासून पुण्यात कर सल्लागार आणि सरकारमान्य लेखा परीक्षक म्हणून कार्यरत असून पिंपरी – चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पाली भाषाप्रेमाविषयी शोध घ्यायचा असेल तर त्यांच्या बालपणात डोकवावे लागेल. सांगली परिसरातील प्रख्यात बौद्ध साहित्यिक जगन्नाथ तथा बाबा भारती हे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समकालीन साहित्यिक होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांची आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीतून बाबा भारती यांच्या लेखनाला अधिकच प्रेरणा मिळाली. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार हा बहुमान प्राप्त करणाऱ्या बाबा भारती यांनी सुमारे पंचवीस हजार शब्दांचा पाली – मराठी हा शब्दकोश सिद्ध केला. थेरवाद बौद्ध धर्माच्या त्रिपिटक या मूळ पाली भाषेतील ग्रंथाचा भाग असलेल्या ‘धम्मपद’ हा बाबा भारती यांनी केलेला मराठी अनुवाद बौद्ध धर्म आणि पाली भाषा यांचे अभ्यासक असलेल्या असंख्य जिज्ञासूंसाठी अमूल्य अशी देणगी ठरली. याशिवाय बाबा भारती यांनी एकूण चौदा ग्रंथांचे लेखन केले.
बौद्ध समाजासह सर्व धर्मांशी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अशा सत्पुरुषाच्या पोटी जन्म घेण्याचे भाग्य महेंद्र यांना लाभले. तीन बहिणी अन् तीन भाऊ अशा भावंडांच्या गोतावळ्यात वयाने कनिष्ठ असलेल्या महेंद्र यांना वडिलांच्या कार्याची थोरवी बालपणी जाणवली नसली तरी त्यांच्या अफाट वाचनाचे अन् अभ्यासाचे त्यांच्या बालमनावर नकळत संस्कार झालेत. बालपणापासून पाली भाषेची गोडी लागली. भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रांचा सखोल अभ्यास करता आला. धम्मपदांमधून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये आणि जगाला शांती व करुणेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माविषयी निष्ठा मनात खोलवर रुजली. आपल्या वडिलांप्रमाणेच सामाजिक सौहार्द अन् सलोखा कायम राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. या कार्यासाठी बाबा भारती यांचे साहित्य ही मोठी मौल्यवान शिदोरी आहे, याची महेंद्र यांना जाणीव झाली. त्यामुळेच त्यांनी पाली – मराठी हा शब्दकोश महाराष्ट्रभर पोचवला. ‘धम्मपद’ या ग्रंथाच्या आजपर्यंत पाच आवृत्या प्रकाशित करून त्यादेखील महाराष्ट्रभर पोचवण्यात अथक प्रयत्न केले आहेत. याशिवाय बाबा भारती यांचे समग्र साहित्य पुन:प्रकाशित करण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. धम्मपद हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक बुद्धविहारात पोचला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पिंपरी – चिंचवड येथील अशोक सर्वांगीण संस्था तसेच बंधुता प्रतिष्ठान या संस्थांच्या विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये महेंद्र भारती यांनी सक्रिय योगदान दिले आहे. यासाठी इस्लामपूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले, ‘आई महोत्सवा’साठी भरीव सहकार्य केले; तसेच वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झालेल्या विचारवेध संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी करण्यात मौलिक योगदान दिले आहे.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विविध संस्थांमध्ये सक्रिय योगदान देत असतानाच महेंद्र भारती यांना अधिक व्यापक कार्यासाठी आपली स्वतःची स्वतंत्र संस्था असावी, असे वाटू लागले; आणि त्यातून त्यांनी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
प्रतिष्ठानच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्तींना जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये आदर्शगाव हिवरेबाजारचे पद्मश्री पोपटराव पवार, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवड येथील पद्मश्री गिरीश प्रभुणे, इस्लामपूर येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आणि माजी कॅबिनेट मंत्री अण्णा डांगे, ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, नवी दिल्ली येथील ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे महामंत्री प्रा. डॉ. अशोक पगारिया, सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली अध्यासन प्रमुख डॉ. महेश देवकर, रूपीनगर, निगडी येथील ज्ञानदीप विद्यालयाचे प्रा. सूर्यकांत भसे, राजुरी येथील विद्या विकास मंदिरचे प्रा. जी. के. औटी, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. बी. एस. पाटील या मान्यवरांचा समावेश आहे. जन्मशताब्दीनिमित्त प्रतिष्ठानने वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध साहित्यिक उपक्रम राबविले. या उपक्रमांतर्गत सामाजिक सौहार्द अन् जातीय सलोखा यांचा पुरस्कार करणार्या साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच या विषयांना केंद्रस्थानी ठेवून कविसंमेलनांचे आयोजन करण्यात आले. भावी काळात ‘गौतम बुद्ध समजून घेताना…’ या विषयावर प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक बुद्धविहारामध्ये व्याख्याने आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रत्येक महिन्यात पाली भाषा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. शांत, संयमी, सुस्वभावी अन् मितभाषी व्यक्तिमत्त्वाच्या महेंद्र भारती यांना सम्यक विचारांचा पाईक म्हणून केलेल्या सामाजिक कार्याप्रीत्यर्थ ‘धम्मभूषण’ किताबाने गौरविण्यात आले आहे. एकीकडे मानवाची वेगाने भौतिक प्रगती होत असताना दुसरीकडे जातीय, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक आणि भाषिक अस्मिता वाढत जाऊन संघर्ष होत आहेत. जग पुन्हा महायुद्धाची भाषा करू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘युद्ध नको तर बुद्ध हवा!’ हा विचार जगाला अन् पर्यायाने मानवतेला विनाशापासून वाचवू शकतो. अर्थातच यासाठी महेंद्र भारती यांच्यासारख्या सम्यक विचारांचे निष्ठावान पाईक हवे आहेत. या कार्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा!















