तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचा प्रारंभ सोमवार, दिनांक ०२ जून २०२५ रोजी होणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, प्लॉट क्रमांक ५१३, पेठ क्रमांक २७, संत तुकाराममहाराज उद्यानासमोर, प्राधिकरण, निगडी येथे दररोज सायंकाळी ठीक ०६:३० वाजता व्याख्यानाला सुरवात होईल.
पंधराव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या मधुश्री व्याख्यानमालेत सोमवार, दिनांक ०२ जून रोजी डॉ. मानसी हराळे ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला प्रमुख समन्वयक सुहास पोफळे यांची अध्यक्ष आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी उपस्थिती राहील.
मंगळवार, दिनांक ०३ जून रोजी प्रा. दिगंबर ढोकले ‘लाखात एक व्यक्तिमत्त्व’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे अध्यक्षस्थान भूषविणार असून माजी नगरसेविका शर्मिला बाबर प्रमुख पाहुण्या आहेत.
व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प निवृत्त पोलीस अधिकारी अविनाश मोकाशी ‘गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि कायदे’ या विषयाच्या माध्यमातून गुंफणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे अध्यक्षस्थानी असतील तर दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक संस्थेचे सचिव मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहील.
व्याख्यानापूर्वी, दररोज सायंकाळी ६:०० ते ६:३० या वेळेत श्रोत्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात येणार असून नि:शुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला आविष्कार या संस्थेच्या अध्यक्षा माधुरी ओक यांनी केले आहे.













