“केशवनगर विसर्जन घाटावर आरतीसाठी योग्य चौथऱ्याची मागणी – भाविकांच्या सुविधेसाठी महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांचे आवाहन”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी-गणपतीच्या आगमनाने वातावरण भक्तिमय झाले असून, अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन देखील सुरू झाले आहे. यानंतर गौरी आणि इतर गणपतींचे विसर्जन होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर, केशवनगर गणेश विसर्जन घाटावर आरतीसाठी योग्य चौथऱ्याची तातडीने गरज आहे, अशी मागणी महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी केली आहे.
मधुकर बच्चे हे दरवर्षी केशवनगर घाटाची पाहणी करतात आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करतात. या वर्षी सुद्धा त्यांनी घाटाची पाहणी करून आरतीसाठीच्या व्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे.
गेल्या वर्षी आरतीसाठी चौथऱ्याची योग्य सोय नसल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी रस्त्यावर उभे राहून आरती केली, तर काहींनी आजूबाजूच्या कठड्यांचा आधार घेतला. घाटावर दोन चौथरे बांधण्यात आले होते, मात्र ते चुकीच्या (दक्षिण-उत्तर) दिशेने बांधले गेले. गणेश भक्त पारंपरिक रीतीनुसार पूर्व-पश्चिम दिशेने आरती करण्यास प्राधान्य देतात. ही बाब संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही, वेळेअभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर, मधुकर बच्चे यांनी घाटावर तीन चौथरे त्वरित बांधावेत किंवा किमान पाच टेबलांची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. “गणेश भक्तांच्या श्रद्धेशी आणि भावनेशी खेळू नये,” असे आवाहन त्यांनी प्रशासनासह संबंधित यंत्रणांना केले आहे.
भाविकांच्या सोयीसाठी वेळेत योग्य व्यवस्था केली गेल्यास उत्सव अधिक भावपूर्ण आणि सुव्यवस्थित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















