ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

लोणावळ्यात लॉंग वीकेंडची गर्दी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Spread the love

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनंतर लागूनच शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने, या लॉंग वीकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर लोणावळा आणि खंडाळा परिसरात धाव घेतली आहे. परिणामी, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विशेषतः पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासनतास या कोंडीत अडकून रहावे लागत आहे.

लोणावळा शहरातही याचा परिणाम स्पष्टपणे जाणवत असून, शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांजसे की भुशी धरण, लायन्स पॉईंट, खंडाळा राजमाची गार्डन, ड्युक्स नोज पॉइंट, सनसेट पॉइंट आणि खंडाळा तलाव या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून, कालपासून संपूर्ण परिसरात दाट धुके पसरले आहे. अशा हवामानात भटकंतीचा अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यात थांबत आहेत. सौंदर्य टिपण्यासाठी मोबाईल आणि कॅमेर्‍यामध्ये निसर्गचित्रे टिपण्याची लगबग देखील सर्वत्र दिसून येत आहे.

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. घाट परिसरात काही वाहने बंद पडल्यामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.

हा ट्रॅफिकचा त्रास आणि गर्दी पाहता, पुढील काही दिवस पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी योग्य नियोजन आणि काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button