पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीनारायण नगर सेवाभावी संस्थेचा “एक हात मदतीचा” उपक्रम

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही केवळ जबाबदारी नसून ती सेवाभावाची जाणीव आहे. हाच सेवाभाव लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण नगर सेवाभावी संस्था यांनी पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
मराठवाड्यातील बीड, बार्शी, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या माध्यमातून केंद्रीय प्राथमिक विद्यालय, आंबी (ता. भुम, जि. धाराशिव) येथील विद्यार्थ्यांना अंदाजे १५० ते १६० शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अंकुश निवळकर यांनी भूषविले. या प्रसंगी नाना माखले, संतोष गवते, अमोल जाधव, नेताजी आडबळे, राहुल मोटे, गिलबीले साहेब, जगताप साहेब तसेच आंबी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बालचमु उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून सर्व उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. “लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहून आमचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले,” असे अध्यक्ष अंकुश निवळकर यांनी सांगितले.
संस्थेच्या नावातच “सेवाभाव” असल्याने समाजासाठी कार्य करणे हीच आमची खरी ओळख आहे, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.













