कुदळवाडी शाळेची टेक्नोसेव्ही शाळा म्हणून ओळख – सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळवाडी शाळेत ‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’चे उद्घाटन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासन आणि लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुदळवाडी शाळा आहे. या शाळेची ‘टेक्नोसेव्ही’ शाळा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या प्रत्येक शाळेला डिजिटल बनवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पब्लिक स्कूल, कुदळवाडी क्र. ८९ या डिजिटल शाळेमध्ये ‘प्रिझम सॉफ्टवेअर डिस्प्ले बोर्ड’ या उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पर्यवेक्षिका आशा निगडे, प्रमिला होले, मुख्य समन्वयक मंदाकिनी गोसावी, दिनेश यादव, माजी महापौर राहुल जाधव, संभाजी बालघरे, युवराज पवार, सुनील यादव यांच्यासह विद्यार्थी, पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त मोरे यांनी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कामाचे कौतुक करतानाच सांगितले की, कुदळवाडी शाळेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी, बोनाफाईड दाखला, गुणपत्रिका, प्रवेश फॉर्म, शाळेतील उपक्रमांची नोंद, ग्रंथालयातील पुस्तकांची नोंद यांसारखी कामे यशस्वीरित्या राबवली जात आहेत.या शाळेतील बालवाडीतील ११८ व इयत्ता पहिली ते आठवीचे ९७० विद्यार्थी यांची दैनंदिन हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची थेट प्रात्यक्षिक चाचणी देखील केली. या सॉफ्टवेअरमुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता व आधुनिक डिजिटल अनुभव मिळणार आहे.








