पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देशाची माती, तिथले लोकसंगीत, आणि परंपरेची वीण घेऊन दूर शहरात आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात आपल्या मूळ गावाचे एक हळवे स्थान असते. याच मातीचा सुगंध आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून खान्देशाची समृद्ध परंपरा जिवंत ठेवण्याचा एक हृदयस्पर्शी प्रयत्न केला जात आहे.
यंदाच्या उत्सवाचे दुसरे वर्ष आहे आणि या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, राज्यसभा खासदार मा. श्री. उज्जलजी निकम यांना खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दि. २ ते ४ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांत आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे होणारा हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी एकत्र येण्याचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटून घेण्याचा एक भावनिक दुवा आहे.
खान्देशातील संस्कृती आणि परंपरेचा हा अविस्मरणीय जागर अनुभवण्यासाठी आणि पुढील पिढीला आपला समृद्ध वारसा जपण्याची प्रेरणा देण्यासाठी सर्व खान्देशी बांधवांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढविण्याचे आवाहन उत्सवाचे आयोजक सर्व खान्देशी समाज बांधव आणि प्रमुख संयोजक श्री.नामदेवराव ढाके यांनी केले आहे.
उत्सवाची सविस्तर रूपरेषा
शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड, पुणे येथे सप्ता पूजन आणि गहू दळण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. याप्रसंगी गीतकार अशोक वनारसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून “किल्लू नि भाजी कयन्यानी भाकर” हे पारंपारिक खान्देशी गीत सादर केले जाईल, जे उपस्थितांना खान्देशी लोकसंस्कृतीचा अनुभव देईल.
रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५: दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून सुरू होऊन आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे समाप्त होईल. मिरवणुकीत शिरपूर येथील श्री गोल्डन बँड आणि अमळनेर येथील श्री राधे कृष्ण बँड कन्हेरे आपल्या संगीतमय सादरीकरणाने उत्साह वाढवतील. विशेष आकर्षण म्हणजे, धुळे आणि नंदुरबार येथील आदिवासी समाज बांधवांचे आकर्षक आदिवासी नृत्य सादरीकरण मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरेल. या मिरवणुकीत कलशधारी महिला आणि पारंपारिक वेशभूषेतील पुरुषांचा सहभाग लक्षवेधी ठरणार आहे, ज्यामुळे खान्देशी संस्कृतीचे विहंगम दर्शन घडेल. सायंकाळी ६ वाजता आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. यामध्ये, श्री कानबाई मातेचे पूजन आणि उत्सव उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल.
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजल्यापासून श्री कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप, शिरपूर-धुळे-पुणे चे गायक सागर देशमुख, दिलीप बी. शिंदे, कुणाल महाजन, दिनेश शिंदे हे श्री कानबाई मातेच्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सादर करतील.
*सन्माननीय उपस्थिती:*
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच राज्याचे जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री. जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे आणि अन्न व पुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील, खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे, आमदार श्री. शंकर भाऊ जगताप, आमदार श्री. महेश दादा लांडगे, आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण, आमदार श्रीमती उमाताई खापरे, आमदार श्री. अमित गोरखे, आमदार श्री. राम भदाणे, माजी आमदार श्री. कुणाल बाबा पाटील, आमदार श्री. सुरेश भोळे, पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. साहेबराव पाटील, दैनिक लोकमतचे समूह संपादक श्री. विजय बाविस्कर, दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादक मा. शितल पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५: सकाळी ८ वाजता विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक श्री आहेर गार्डन येथून सुरू होऊन श्री जाधव घाट, रावेत येथे श्री कानबाई मातेचे विसर्जन होईल. या विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण शिरपूर येथील श्री गोल्डन बँड असणार आहे.
*प्रमुख संयोजक आणि आयोजक समाज मंडळे:*
या भव्य सोहळ्याचे प्रमुख संयोजक श्री नामदेवराव ढाके (सभागृह नेते, सरचिटणीस भाजपा पिंपरी-चिंचवड शहर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य) हे आहेत. हा उत्सव पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील खान्देशातील सर्व समाज बंधू-भगिनींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुर्जर स्नेहवर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खान्देश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खान्देश माळी समाज महासंघ, संत सेना महाराज, खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खान्देशी अहिराणी कस्तुरी मंच, आप्तेष्ट मराठा मंडळ, बारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खान्देश लाडशाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ, कानुबाई सेवा फाऊंडेशन, तसेच इतर सर्वच खान्देशी समाज बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
*उत्सवाचे नियोजन आणि तयारी:*
या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुवारी सायंकाळी आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सर्व खान्देशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाचे स्वरूप, स्वयंसेवक नेमणूक, मंडप आणि सजावट, प्रसाद वाटप व भोजन व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा आणि विचारमंथन झाले. आई कानबाईवरील श्रद्धा आणि खान्देशी संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, हजारोंच्या संख्येने भाविक गण या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासाठी. ५०० हून अधिक स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, मिरवणूक, कानबाईचे दर्शन, आकर्षक मंडप आणि सजावट, प्रसाद वाटप आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांची ही एकजूट आणि सहकार्य निश्चितच या उत्सवाला अविस्मरणीय बनवेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.














