ताज्या घडामोडीपिंपरी

शब्दवैभव काव्यसंमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

 

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे निमंत्रित कवींचे “शब्संदवैभव काव्य संमेलन” नुकतेच संपन्न झाले. भक्ती शक्ती चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या प्रांगणात अनेक कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण रचना सादर केल्या. जेष्ठ साहित्यीक प्रा. तुकाराम पाटील हे अध्यक्षस्थानी होते . तर जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, साहित्य मंच चे अध्यक्ष राजेंद्र घावटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध रंगाच्या, ढंगाच्या कवितांनी संमेलनास रंगत आणली. विविध विषयांवर कविंनी कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
“माहेरचा सूर्य लाडिक वागतो
कोवळ्या किरणांनी हलकेच जागवतो
सासरच्या सूर्य भल्या पहाटे येई,
दिस उगवायच्या आधी होते कामाची घाई” अशा शब्दात सविता इंगळे यांनी महिला वर्गाच्या भावना मांडल्या.

“आला आखाजीचा सण, झोका झाडाले बांधू,
पाय भूईवर ठेवून, झेप आकाशात घेऊ”
म्हणत मा.पीतांबर लोहार यांनी अक्षय तृतीया अर्थात आखाजी सणाची खानदेशी अहिराणी बोलीभाषा ढंगातील गेय कविता सादर करून मंत्रमुग्ध केले.
“अंगणात भुंगा करतोया दंगा
गुण गुण गातो गाणी
गुण गुण गातो गाणी””शोभा जोशी यांनी काव्यात अंगण चित्ररूपाने उभे केले. तर,
“प्रत्येक थेंब पाण्याचा जपायलाच हवा
उद्यासाठी जमिनीमध्ये साठवायला हवा ” कैलास भैरट यांनी पाण्याचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगितले.

“दाट भरावं आभाळ कोसळांव धरेवर
धारा झिम्माड, झिम्माड माझीच आस खरोखर ” यातून वंदना इन्नाणी यांनी पावसाची ओढ दाखविली.
कविता महाराष्ट्र गर्जना “लावूनी बाजी प्राणांची वीरगती ज्यांनी पत्करली होते. दिलदार सरदार ते निष्ठावान राजांना”अशी ज्येष्ठ कवी बाबू फिलीप डिसोजा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त जागविली.

“फेकून द्या रे भेद गड्यांनो, देश भारत समर्थ रहावा,
विचार पेरूनी बंधुत्वाचा, माझा भारत एक व्हावा ”
संयोजक कवी मा.राजेंद्र घावटे यांनी भेद विसरून बंधुत्वाचा विचार पेरून देशाला एकसंध करण्याचा संकल्प केला.

मराठी दोहे मा.राज अहेरराव यांनी सादर केले “साधू साधा शोध तू, नको टिळ्याची आस पोपटपंची न कामी, व्यर्थ होई प्रवास” या दोह्याने अंतर्मुख केले.
सुत्रसंचालिका सीमा शिरीष गांधी यांनी अक्षर महत्त्व सांगितले. आपल्या कवितेतून त्या म्हणाल्या
“अक्षरनगरीच्या सफरीत घडावे सारे मंगलमय,
न उरावी असूया, न उरावे भय
मौनातल्या शब्दांचा ईश्वरास अर्थ कळावा…
पुढला जन्म मात्र अक्षरांचाच मिळावा”
प्रथितयश हास्य कवी मा. अनिल दीक्षित यांनी पत्रात काय ते लिवा म्हणत राजकारण्यांना चिमटे काढले.
शोभा जोशी, चंद्रकांत धस, मीना शिंदे, रमेश उमरगे, रेवती साळुंखे, पीतांबर लोहार, बाबू डिसोजा, रेणुका हजारे, सुनंदा शिंगनाथ, हेमंत जोशी, नीलेश शेंबेकर, सविता इंगळे, कैलास भैरट, पौर्णिमा कोल्हे, अरुण कांबळे, ज्योती देशमुख, दत्तू ठोकळे, वंदना इन्नाणी या निमंत्रित कवींनी सहभाग घेतला. गझल, लावणी, सवालजबाब, दोहे, मुक्तच्छंद अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकारांच्या आशयगर्भ कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

प्रास्ताविक राजेंद्र घावटे यांनी केले.सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले.वीरशैव लिंगायत समाज, बसवेश्वर पुतळा समिती, मल्लिकार्जुन प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड म न पा. आदींनी संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button