पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्या शाळेची पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी जबाबदारी स्वीकारली. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर क्रांतिकारी विचारांच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या अग्रदूत होत्या. विषमतेने ग्रासलेल्या समाजात स्त्रिया व शोषितांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, कष्टकरी घरेलू कामगार संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार उपस्थित होत्या. यावेळी बांधकाम विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना कांबळे, सुनीता पोतदार, कलावती पाल, वत्सला ठोकळ, सुमित्रा जैस्वाल, मालन चव्हाण, वनमाला कांबळे, सुनंदा साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला सन्मान मेळाव्याच्या निमित्ताने शिक्षिका सारिका शिंदे व रेखा नायडू यांच्यासह कलावती शिंदे यांचेसह कष्टकरी महिलांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना नखाते म्हणाले की, अंधश्रद्धा व जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी ज्ञान हाच एकमेव मार्ग आहे, हे फुले दांपत्यांनी ओळखले. त्यांच्या लेखणीने आणि कृतीशील कार्यपद्धतीने वर्णव्यवस्था व सांस्कृतिक वर्चस्ववादावर प्रहार केला.
अध्यक्षीय भाषणात माधुरी जलमूलवार म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी विधवा महिलांना आधार दिला, केशवपनासारख्या अमानवी प्रथेविरोधात संघर्ष केला तसेच घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून समतेचा संदेश दिला. अशा महान विचारवंत सावित्रीबाई फुले आजही समाजाला दिशा देणाऱ्या प्रेरणास्थान आहेत.

















