कामगार मृत्यूस दोषीवर गुन्हा दाखल करून वारसांना १०लाख रु. अर्थसाह्य द्या – कामगार नेते काशिनाथ नखाते
पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच कामगार उप आयुक्त यांची भेट घेऊन सुरक्षेवर केली चर्चा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कामगार यांचे जीवन असुरक्षित असून नांदेड सिटी पुणे येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये महानगरपालिका ठेकेदार, अधिकारी यांच्या अक्षम्य चुकामुळे कामगार मृत्युमुखी पडलेला आहे संबंधित दोषींवरती गुन्हा दाखल करून मृतांच्या वारसाला १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे व जखमीना उपचारासह अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे आज भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच कामगार उप आयुक्त निखिल वाळके यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक सुनील भोसले, सलीम डांगे, महादेव गायकवाड लाला राठोड आदी उपस्थित होते.
महासंघातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिकेच्या वतीने नांदेड सिटीच्या जवळ कलाश्री इमारतीच्या सीमा भिंती लगत, नदीपात्राच्या जवळ नदी सुधार योजना जायका प्रकल्पा अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. येथे खोदलेल्या खड्ड्यात काही कामगार काम करत होते, यावेळी त्या कामगारांची सुरक्षितता पाहिली गेली नाही. महानगरपालिका आणि ठेकेदार यांनी सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केलेला आहे. आणि शेजारीच वरील भागात जेसीबीच्या माध्यमातून काम सुरू होते असे निदर्शनास येत असताना धोकादायक खड्ड्यालगत काम सुरू ठेवले. सायंकाळी सदर काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर मातीचा मोठा ढिगारा पडला आणि त्याखाली चार कामगार अडकले. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यामध्ये निष्पाप कनीराम प्रजापती हे मृत्युमुखी पडलेले आहेत.
वास्तविक अशा बेजबाबदार कंत्राटदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारच्या घटना महापालिका क्षेत्रामध्ये किंवा आपल्या जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये होऊ नयेत याची दक्षता आणि काळजी घेण्यासाठी अधिकारी यांचे पथक नेमण्यात यावे व योग्या ती काळजी घ्यावी तसेच मृतांच्या वारसांना १० लाख रुपये अर्थसहाय्य करावे. जखमी कामगारांना देखील अर्थ सहाय्य देण्यात यावे. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आपले कार्यालयासमोर लवकरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावर निखिल वाळके यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नमूद केले.








