ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
विशेष लेख : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील : बहुजनांच्या शिक्षणक्रांतीचे आधारवड -डॉ.कामायनी गजानन सुर्वे

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांच्या शिक्षणक्रांतीचे आधारवड आहेत.२२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावात जन्मलेल्या या महामानवाने अज्ञानी, वंचित, शोषित आणि उपेक्षित बहुजन समाजाला जीवनसमृद्धीच्या ज्ञानप्रकाशाकडे नेण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन असल्याचे ओळखून महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी व शैक्षणिक विचारांना अनुसरून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली .त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी वेचले. श्रमाला प्रतिष्ठा देत त्यांनी तळागाळातील मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले. भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे जपले, वाढवले आणि शिकवले.त्यांना सुजाण नागरिक बनविले.महात्मा जोतीराव फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज ,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक परिवर्तनवादी विचारांनी कर्मवीर भाऊराव पाटील प्रेरित झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या वसतिगृहयुक्त शिक्षण पद्धतीने प्रभावित होऊन सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा घेतली. शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांपैकी सगळ्यांत मोठा प्रभाव अण्णांवर पडला तो त्यांच्या अस्पृश्यता निवारण व बहुजन समाजाच्या शिक्षणप्रेमाचा.वसतिगृहयुक्त शैक्षणिक चळवळीतून मुलांना नैतिक शिक्षण व शिस्तीचे धडे मिळून ते जबाबदार नागरिक व्हावेत, शिक्षणाने जातिअंत व्हावा व वसतिगृहातील तरुणांमधून सामाजिक कार्यकर्ते तयार व्हावेत ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती .कर्मवीर अण्णांनी जातिभेद , अस्पृश्यता आणि अन्य अन्यायकारक सामाजिक परंपरांचा ठाम विरोध केला. त्यांनी ‘रयत’ म्हणजे सर्वसामान्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा निर्धार केला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांनी प्रभावित होऊन भाऊरावांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला.सत्यशोधकी जलसे घालून त्यांनी ग्रामीण भागात अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी यांविरुद्ध जनजागृती केली. गावोगावी जाऊन त्यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध सशक्त लढा दिला. कर्मवीर अण्णांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले (ता. कराड, जि. सातारा) येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ‘रयत’ हे नाव सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष आहे जे शाश्वत विस्ताराचा आणि अक्षय्यतेचा संदेश देते .
कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या ‘शाहू बोर्डिंग’ या वसतिगृहात विविध जातीधर्मांची मुले एकत्र राहून आणि श्रम करून शिक्षण घेत. विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृह असलेल्या त्या काळात हा अभिनव प्रयोग होता.इ.स.१९२७ मध्ये महात्मा गांधींनी या बोर्डिंगला भेट दिली व मी जे साबरमती आश्रमात करू शकलो नाही, ते भाऊराव तुम्ही साताऱ्यात प्रत्यक्षात साकारले आहे,असा अण्णांच्या या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
कर्मवीर अण्णांची ‘मुष्टिफंड योजना’ अद्वितीय आहे .वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाकरिता कर्मवीर अण्णांनी स्थानिक ग्रामीण लोकांची मदत घेतली.या मुलांकरिता गावातील गृहिणी दळण दळण्याआधी एक मूठ धान्य बाजूला ठेवत आणि मग वसतिगृहातील मुले ते धान्य गोळा करून आणत असत. त्या अन्नधान्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी होत असे.संस्थेच्या कार्यासाठी एकाच धनाढ्याकडून हजार रुपये घेण्यापेक्षा, हजार लोकांकडून एक-एक रुपया घेणे अण्णांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते , कारण यामुळे प्रत्येकाला वाटते की ही संस्था आपली आहे.स्वावलंबन, स्वाध्याय, सहजीवन आणि स्वाभिमान या मूल्यांची शिकवण देणारे हे वसतिगृह समाजात एक वेगळे स्थान निर्माण करत होते.अण्णांनी दुर्गम भागांत व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या.त्यासाठी त्यांनी गावोगाव सभा घेतल्या, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षकांना गावात नेऊन, शाळेसाठी जागा मिळवणे, राहण्याची सोय करणे, स्थानिक पातळीवर मदत मिळवणे या सर्व जबाबदाऱ्या भाऊराव स्वतः पार पाडत.
मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे महाविद्यालयात पाठवण्याची गरज निर्माण झाली तेव्हा साताऱ्यात कॉलेज नव्हते. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणीच उच्च शिक्षणाची व्यवस्था होती.त्यांनी पुण्यात जात, धर्म, आर्थिक स्थिती याकडे दुर्लक्ष करून केवळ मूल्याधिष्ठित शिक्षण देणारे युनियन बोर्डिंग हाऊस’ सुरू केले, जे शाहू बोर्डिंगच्या धर्तीवरच चालवले जात होते. बहुजनांना मोफत उच्च शिक्षण मिळावे याकरिता १९४७ मध्ये अण्णांनी स्थापन केलेले ‘छत्रपती शिवाजी फ्री अँड रेसिडेन्शियल कॉलेज’ हेच पुढे विकसित होऊन आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ म्हणून ओळखले जात आहे .याच कॉलेजमध्ये अण्णांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारी ‘कमवा आणि शिका’योजना सुरु केली,जी आजही अनेक महाविद्यालयांमध्ये व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विविध विद्यापीठांमध्ये अस्तित्वात आहे. एका धनिकाने अण्णांना अशी विनंती केली की मी संस्थेला भरघोस देणगी देतो.मग या कॉलेजचे नाव बदलून माझे नाव द्या.तेव्हा अण्णांनी सांगितले की एकवेळ मी बापाचे नाव बदलेन, पण या कॉलेजला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही.केवढी प्रखर वैचारिक ताकत !
रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यानंतर बारा वर्षांनी, या संस्थेतून शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केलेल्या अठरा विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण जीवन संस्थेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. मूल्यसंवर्धनाचे यापेक्षा मोठे उदाहरण नाही.अण्णांनी जी मूल्ये पेरली, ती या विद्यार्थ्यांच्या रूपाने उगवली. या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाकरिता अण्णांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले.आपल्या भाषणात महर्षींनी सांगितले की, “आक्रोडाच्या झाडाला शंभर वर्षांनी फळे येतात .आक्रोडाचे झाड लावणाऱ्याला त्याचे फळ मिळेलच असे नाही, पण भाऊरावांनी जो शिक्षणाचा वृक्ष लावला, त्याची फळे त्यांना त्यांच्या हयातीतच प्राप्त झाली आहेत.धन्य आहेत भाऊराव, आणि धन्य आहे ही संस्था!”
भाऊरावांचे खरे मोठेपण त्यांच्या त्यागात आणि निष्कलंक जीवनशैलीत आहे. शिक्षणासाठी त्यांनी आपल्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांचे सर्व दागिने गहाण ठेवले. त्यांच्या मुलाला, अप्पासाहेबांना कोल्हापुरात शिक्षणासाठी दहा रुपये स्कॉलरशिप मिळाली असता, भाऊरावांनी त्यांच्याकडून फक्त तीन रुपये स्वतःसाठी वापरण्यास सांगितले आणि उरलेले सात रुपये संस्थेसाठी जमा करण्यास बजावले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या मुलाला स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘तुला संस्थेत नोकरी मिळणार नाही, स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल.’अण्णांचे हे निरपेक्ष वर्तन आज किती प्रासंगिक आहे !
शिक्षण संस्थांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी ‘महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ आणि ‘जिजामाता प्रॅक्टीसिंग स्कूल सुरू केले.आज ज्याला आपण Train to Teachers (ToT) असे संबोधितो, तो प्रयोग त्या काळात अण्णांनी केला.उद्योग जगताला शिक्षण क्षेत्राशी जोडण्याचे कार्य अण्णांनी केले,ज्याला आपण आज college-industry coordination असे म्हणतो.ओगले,किर्लोस्कर व कूपर यांसारख्या तत्कालीन उद्योजकांना त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी निधी द्यायला उद्युक्त केले.आज याच बाबीचा उल्लेख आपण Corporate Social Responsibility(CSR funds) असा करतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच समता,बंधुता,श्रमसंस्कार या मूल्यांची शिकवण अण्णांनी स्वतःच्या शुद्ध आचरणातून विद्यार्थ्यांना दिली.यालाच आज आपण Value Education असे म्हणतो.
कर्मवीर अण्णांची शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी सर्वसामान्यांना समजेल व व्यवहारात आणता येईल अशीच कृतिशीलतेवर अधिक भर देणारी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभी राहिलेली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वांत मोठी, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते.आज संस्थेची कालानुरूप प्रगतीशील वाटचाल सुरु आहे.शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर,कृत्रिम बुद्धिमत्ता,नाविन्यपूर्ण संशोधन,उद्योजकता विकास,प्रशासकीय अधिकारी घडविणारे मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांमधून संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच पुरोगामित्वाचे सामाजिक परिवर्तन आकारास येत आहे. आज परदेशी विद्यापीठांच्या महाराष्ट्रात आगमनाच्या व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या काळात अण्णांचे मूल्याधिष्ठित शैक्षणिक विचार व कृती नक्कीच पथप्रदर्शक आहेत.













