ताज्या घडामोडीपिंपरी
कन्याकुमारी येथे प्रा. संजय पवार यांच्या ‘तापी इंद्रायणी’ कवितासंग्रहाचे लोकार्पण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथील विवेकानंद शिळा मंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांच्या ‘तापी इंद्रायणी’ या कवितासंग्रहाचे लोकार्पण सोहळा (१४ ऑक्टोबर) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे लोकार्पण विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारीचे प्रमुख व्यवस्थापक श्री. थनु तसेच गणराज टूर्सच्या संचालक सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक पर्यटक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. थनु यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून देत, “मानव निर्माण आणि राष्ट्र निर्माण हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे,” असे सांगितले आणि प्रा. पवार यांच्या साहित्य कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
प्रा. संजय पवार यांनी ‘तापी इंद्रायणी’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा व त्यांच्या संघर्षपूर्ण प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. या पुस्तकाची प्रस्तावना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी लिहिली आहे.
कार्यक्रमाचे संयोजन व संचालन श्री. सुमेश पाराशरे यांनी केले तर स्वागत व आभारप्रदर्शन सौ. अनिता शिंदे यांनी केले.
हे पुस्तक पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले असून स्नेहवर्धनचे हे १५५५ वे प्रकाशन आहे.













