खान्देश बांधवांच्या तीन दिवसीय ‘आई कानबाई’ उत्सवात भाविकांचा महापूर
“कानबाई माता नाही कोणा एकाची आहे समस्त खान्देशाची , या भावनेची सर्वत्र प्रचिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडेनगर येथील चिंतामणी चौकातील पीएमआरडीए ग्राउंड येथे समस्त खान्देश बांधव कानबाई माता उत्सव समिती आणि श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आई कानबाई माता सार्वजनिक उत्सव २०२५’ उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. उत्सवात कोणताही राजकीय गट किंवा नेत्याचे वर्चस्व न राहता, सर्व पक्ष व सर्व विचारधारांचे लोक एकत्र आले होते. यामुळे कार्यक्रमात सामंजस्य, सहकार्य आणि सौहार्दाचे वातावरण होते. “कानबाई माता नाही कोणा एकाची आहे समस्त खान्देशाची” ही भावना कार्यक्रमभर दिसून आली.
तीन दिवस चाललेल्या या उत्सवात पारंपरिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गहू दळणे, सप्तपूजन, कीर्तन, भजन, आणि मिरवणूक यांसारखे विविध कार्यक्रमांचे नियोजन सुरळीत करण्यात आले. पहिल्या दिवशी ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या कीर्तनासाठी सुमारे पाच हजार भाविक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी, कानबाई मातेच्या स्थापनेच्या दिवशी, भक्तांची संख्या वाढून बारा हजारांवर पोहोचली. तिसऱ्या दिवशी, विसर्जन मिरवणुकीस मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. रात्री आठ वाजता गायक आबा चौधरी, धीरज चौधरी आणि शीरपुरकर यांची देवीची भक्तीमय गीते आणि अहिराणी भाषेतील गीते एकूण भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते. ‘स्वरगंगा बँड’ नेही कार्यक्रमात रंगत आणली होती. देवीची मिरवणूकही शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
उत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट दिली. यामध्ये खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शंकर जगताप, आमदार अनिल दादा पाटील, आमदार कुणाल पाटील, पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे, तसेच माजी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेविका , संगीताताई भोंडवे, करुणा चिंचवडे, शारदा सोनवणे, चिंचवड विधानसभेचे शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, माधव पाटील, राजेंद्र चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, माऊली सूर्यवंशी यांनीही उत्सवात उपस्थिती लावली. उत्सवाच्या आयोजनामध्ये समस्त खान्देश बांधव उत्सव समिती आणि श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट यांनी प्रमुख भूमिका बजावली. नियोजन, सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, प्रसाद व्यवस्था, आरोग्य सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, “असा उत्सव मी याआधी पाहिलेला नाही. एकमेकांवर कोणतीही टीका किंवा वर्चस्व न ठेवता, सर्व लोकांनी मिळून एकोप्याने सहभाग घेतला. यामुळे ही परंपरा जपली गेली आहे. अशा प्रकारचे आयोजन इतर भागातही व्हावे अशी अपेक्षा आहे.”
त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थित राहून उत्सवाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “हा उत्सव केवळ धार्मिकता नाही, तर सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. याच धर्तीवर धार्मिक कार्य्कार्माच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश दिला जावा.”
‘सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि समन्वयाच प्रतीक’
‘आई कानबाई उत्सव हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर तो एक सामाजिक ऐक्याचा, श्रद्धेचा आणि समन्वयाचा प्रतीक बनला. कोणतीही अडचण न येता, कोणताही गाजावाजा न करता, शांततेत, भक्तिभावात आणि सामाजिक सलोख्यात साजरा झालेला हा उत्सव अनेकांसाठी प्रेरणादायक ठरला. उत्सवामध्ये एक विशेष बाब म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याने वैयक्तिक श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वांनी सामूहिक प्रयत्नातून कार्यक्रम पार पाडला. कोणताही फोटो, बॅनर, जाहिरात किंवा घोषणाबाजी न करता कार्यक्रम पार पाडण्यात आला. यामुळे उपस्थित भाविकांमध्ये समाधान आणि श्रद्धेची भावना दिसून आली.








