ताज्या घडामोडीपिंपरी

भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून पैसे वसूल करा आणि त्या ठेकेदारांना काळया यादीत टाका – काळुराम पवार

Spread the love

भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून व्याजासह रक्कम वसूल करा – काळुराम पवार

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. पुढील दोन आठवड्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून हडप केलेली रक्कम व्याजासह वसूल करावी आणि या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या ठेकेदारांना काळया यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी संतोष तेलंग, किरण तेलंग, जितेंद्र ननावरे, गणेश शिंदे, तेजस आगमने, आनंद भिल्ला, मयूर बागले, विजय पाटील, राम विश्वकर्मा कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपा, झोनिपू स्थापत्य विभागातील अधिकारी आणि एच. डी. असोसिएट, तुषार गायकवाड, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन, पद्मिनी कन्स्ट्रक्शन, शहाबाज बशीर तांबोळी, सिद्धीकी प्लंबिंग अँड ड्रेनेज सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपन्यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र विष्णू शिंदे आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांनी संगनमताने एकाच कामाची मनपा कडून अनेकदा बिले घेतली आहेत. तसेच अर्धवट काम करून पूर्ण बिल घेणे, निविदेत ठरलेल्या कामापेक्षा प्रत्यक्ष कमी काम करून पूर्ण रक्कम घेणे, निविदेत ठरलेल्या दरापेक्षा ज्यादा मापे नोंद करून ज्यादा बिल घेणे, सार्वजनिक स्वच्छता गृहामध्ये टाइल्स चे फक्त पॅचवर्क करून पूर्ण बिल घेणे, अनेक ठिकाणी फक्त चेंबरचे झाकण बसवून पूर्ण चेंबरच्या बांधकामाचे बिल घेणे आणि एकाच कामाच्या वेग वेगळ्या नोंदी करून दोनदा बिल घेऊन महानगरपालिकेची कोटयावधी रुपयांची फसवणूक करून सामान्य जनतेच्या पैशांची लूट केली आहे.

उदाहरणार्थ, देव कन्स्ट्रक्शन यांनी ( निविदा क्र. २/१७-२०२२/२३) निविदा रक्कम २४,२३,६१६ रुपये, या बिलामध्ये बिल घेताना ठेकेदाराने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जिमचा उल्लेख करून बिल घेतले. तर दुसरे प्रिफायनल बिल घेताना रामेश्वर डोलारे निवास ते अरविंद गावडे निवास असा उल्लेख करून पुन्हा बिल घेतले. मात्र ही दोन्ही बिले एकाच ठिकाणची आहेत. फक्त त्या ठिकाणाची नावे वेगवेगळी दिली आहेत. याविषयी संदर्भ मोजमाप पुस्तकात नोंदी दिसून येतात. अशाप्रकारे महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने केली आहे. या बाबत मी कार्यकारी अभियंता राजेंद्र विष्णु शिंदे यांना वारंवार स्थळ पाहणी साठी विनंती केली, परंतु त्यांनी नेहमी टाळाटाळ केली. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता पूर्ण माहिती दिली नाही आणि अधिक माहितीसाठी दोन महिन्यापासून ते टाळाटाळ करीत आहेत. हा फक्त एका प्रभागातील भ्रष्टाचार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचे हे उदाहरण म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे.

झोपडपट्टीतील मागासवर्गीय लोकांना विकासापासून वंचित ठेवून मनपाच्या तिजोरीची या अधिकारी व ठेकेदारांनी लूट केली आहे. तरी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर पुढील पंधरा दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करावा व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घ्यावेत व संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकावे अशीही मागणी माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी केली आहे, तसे पत्र काळुराम पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button