ताज्या घडामोडीपिंपरी

पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा २३ एप्रिलपासून प्रारंभ

Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दिनांक २३ एप्रिलपासून होत असून चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. चौतिसाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये बुधवार, दिनांक २३ एप्रिल रोजी ॲड. अनिशा फणसळकर ‘कुटुंब व्यवस्थेच्या र्‍हासाची कारणे आणि उपाय, पण याला जबाबदार कोण?’ या विषयावर प्रथम पुष्पाद्वारे विचार मांडतील. गुरुवार, दिनांक २४ एप्रिल रोजी महेश झगडे, डॉ. सतीश देसाई, उज्ज्वल केसकर ‘स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय राज’ या विषयावर ऊहापोह करतील. शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी डॉ. वर्षा तोडमल ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे स्वामी विज्ञानानंद’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील. शनिवार, दिनांक २६ एप्रिल रोजी डॉ. केदार फाळके ‘छत्रपती संभाजीमहाराजांची राजनीती’ या विषयावर माहिती देतील; तर रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी डॉ. संजय उपाध्ये ‘सत्य, असत्य आणि समाजशांती’ या विषयावर अंतिम पुष्पाची गुंफण करतील. दरम्यान रविवारी सायंकाळी चिंतामणी, क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या सर्व व्याख्यानांचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी केले आहे.

पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत पिंपरी – चिंचवड शहरातील व्याख्यानमालेंच्या वासंतिक सत्रात ३१ मे २०२५ पर्यंत विविध ठिकाणी व्याख्यानमाला संपन्न होणार असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे –

*२८ एप्रिल ते ३० एप्रिल*
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव (व्याख्यानमाला) – निगडी

*१ मे ते ३ मे*
छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला – सावरकर मंडळ निगडी

*४ मे ते ६ मे*
सुबोध व्याख्यानमाला – काळभोरनगर / मोहननगर

*७ मे ते ११ मे*
फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – मोहननगर

*१५ मे ते १७ मे*
स्वामी समर्थ व्याख्यानमाला – शिवतेजनगर

*१८ मे ते २३ मे*
महात्मा गांधी व्याख्यानमाला – मोरवाडी

*२४ मे ते २६ मे*
मधुश्री व्याख्यानमाला – प्राधिकरण

*२९ मे ते ३१ मे*
मातोश्री व्याख्यानमाला – शाहूनगर / शिवतेजनगर

या सर्व व्याख्यानमाला नि:शुल्क असून नागरिकांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button