विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे आदी सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ५६ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ५, ७, ६, ६,२, १०, ४ आणि १६ अशा एकूण तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी नागरिकांनी पावसामुळे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करणे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे, विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, डासांचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेणे, आवश्यक ठिकाणी किटकनाशक फवारणी करणे, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करणे, रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करणे, तुटलेल्या चेंबर्सच्या झाकणांची दुरूस्ती करणे आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.












