आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारले संतांचे रूप

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने भक्तीमय वातावरणात शालेय पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगांच्या गजरात
संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव आधी संतांच्या
वेषात सुंदर सादरीकरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतून भक्ती आणि श्रद्धेचे दर्शन
घडले. विठ्ठल रखुमाईच्या रूपातील विद्यार्थ्यांची झलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
पालकी प्रस्थानाच्या वेळी टाळकरी, वारकरी, तुळशी पथक, पताका पथक या वारकऱ्यांच्या
पारंपारिक वेशातील विद्यार्थ्यांची दिंडी शाळा परिसरात फिरली, फुगडी, रिंगण या उत्साही
वातावरणात परिसर चैतन्यमय झाला. आरोग्य दिंडी या आगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पोषण आणि योगाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन जागृती
करण्याचा प्रयत्न केला. पालखीतील सहभागी विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेण्यासाठी शिक्षक व
पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका
काटकर मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले या उपक्रमासाठी श्री जैन विद्या
प्रसारक मंडळ मंडळाचे मानद सचिव राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहायक सेक्रेटरी
प्रा.अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी मार्गदर्शन केले. अशी माहिती शाळेच्या
प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा काटकर यांनी दिली.













